आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: 'झी गौरव पुरस्कार 2014'चा दिमाखदार सोहळा, सई-अंकुशच्या सूत्रसंचालनाने बहरला कार्यक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनोरंजनाच्या दुनियेत यशाचे अनेक मापदंड प्रस्थापित करणारी मराठी माणसाची अत्यंत जिव्हाळ्याची वाहिनी झी मराठीचे यंदाचे सनसिल्क प्रस्तुत झी गौरव पुरस्कार अत्यंत दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आले. मराठी तारांगणातील लखलखत्या ता-यांच्या विशेष उपस्थितीत सिनेनाट्य रसिकांच्या अलोट गर्दीत वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर हा शानदार सोहळा रंगला. अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंग भरले.
यावर्षी ‘फॅन्ड्री’, ‘अस्तु’, ‘रेगे’, ‘दुनियादारी’ आणि ‘अवताराची गोष्ट’ या चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासाठीची चुरस होती. यात ‘अवताराची गोष्ट’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. तर ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रिअल हिरो’ यावर्षीचा विशेषलक्षवेधी चित्रपट ठरला. तसेच यावर्षीचा सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट म्हणून ‘दुनियादारी’ या चित्रपटाला गौरविल्या गेले.
व्यावसायिक नाट्य विभागामध्ये ‘मि.अॅंड मिसेस’, ‘द डेथ ऑफ कॉंन्करर’, ‘थोडंसं लॉजिक थोडंसं मॅजिक’, ‘एकदा पहावं न करून’ आणि ‘गेट वेल सून’ या नाटकांमध्ये रस्सीखेच होती. यात ‘गेट वेल सून’ या नाटकाने बाजी मारत सर्वोत्कृष्ट नाटकाचा बहुमान मिळवला. तर प्रायोगिक नाटकांमध्ये ‘प्राइस टॅग’, ‘लेझीम खेळणारी पोरं’, ‘क्रॉस रोड’ आणि ‘एका गुराख्याचे महाकाव्य’ यांच्यात चांगलीच सुरस होती. यात ‘लेझीम खेळणारी मुलं’ या नाटकाने बाजी मारली.
बॉलिवूडमध्ये आपली ठसठशीत मोहर उमटवणा-या कलावंताला दरवर्षी ‘मराठी पाऊल पडते’ पुढे या पुरस्काराने झी गौरव सोहळ्यात गौरविण्यात येते. यावर्षी बॉलिवूडची गायिका शाल्मली खोलगडे हिला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
मराठी आणि हिंदी चित्रपटक्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणारे बुजुर्ग लेखक ग. रा. कामत आणि मराठी चित्रपट, नाटक आणि दुरचित्रवाणीच्या क्षेत्रात अभिनयाची भारदस्त कारकीर्द घडवणारे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग. रा. कामत यांना त्यांचे समकालीन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते तर मोघे यांना ज्येष्ठ नाट्यकर्मी आणि नाट्य संमेलनाध्यक्ष अरूण काकडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ग. रा. कामत यांच्या पत्नी ज्येष्ठअभिनेत्री रेखा कामत यांनी त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
आकाशवाणी, दुरचित्रवाणीबरोबरच ‘वा-यावरची वरात’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘बिकट वाट वहिवाट’, ‘गरुडझेप’, ‘बेबंदशाही’, ‘मृत्युंजय’ सारखी नाटकेकिंवा ‘प्रपंच’, ‘नंदिनी’, ‘निवृत्ती ज्ञानदेव’, ‘दैव जाणिले कुणी’,’ अंमलदार’, ‘आम्ही जातो आमच्या गावा’, ‘दोन्ही घरचा पाहुणा’, ‘अश्वमेध’, ‘शेवटचामालुसरा’ यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे श्रीकांत मोघे झी गौरव पुरस्कार स्वीकारताना नुकतेच निर्वतलेले आपले धाकटे बंधु कवी-गीतकार सुधीर मोघे यांच्या आठवणीने भावविवश झाले. “झी मराठीकडून मिळणारा हा सन्मान ही माझ्या कामाची खूप मोठी पावती आहे, मात्र तो स्वीकारताना मराठी चित्रपटांच्या गीतक्षेत्रात भरीव काम करून ठेवलेल्या माझ्या भावाची उणीव मला प्रकर्षाने जाणवतेय”. हा गौरव आपल्या धाकट्या भावाला आपणअर्पण करत असल्याची कृतज्ञ भावना श्रीकांत मोघे यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रेम ही संकल्पना असलेल्या या सोहळ्यात प्रेमाचे विविध आविष्कार घडविण्यात आले. तर रमेश भाटकर, संजय मोने, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, हृषिकेश जोशी, वैभव मांगले, आनंद इंगळे, सुनील तावडे, सुहास परांजपे, प्रियदर्शन जाधव, सुप्रिया पाठारे आणि भाऊ कदम यांच्यासारख्या हुकुमी विनोदविरांनी प्रेमाच्या या जत्रेत हास्याचे अनोखे रंग भरले. तर उमेश कामत, प्रिया बापट, सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, क्रांती रेडकर, दीप्ती केतकर, प्राजक्ता माळी आणि श्रुती मराठे यांनी नृत्यातुन प्रेमाच्या विविध छटा साकारल्या. हा देदीप्यमान सोहळा येत्या 30 मार्च रोजी सायंकाळी 7 वा. झी मराठीवर प्रसारित होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा शानदार सोहळ्याची खास क्षणचित्रे...