आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘झी’ मराठी वाहिनीवर रविवारी ‘फँड्री’चा जागतिक प्रीमियर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त तसेच विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणारा ‘फँड्री’ मराठी सिनेमाचा जागतिक प्रीमियर ‘झी’ मराठी वाहिनीवर येत्या 29 जून रोजी रविवारी सायंकाळी 7 वाजता दाखवण्यात येईल. या सिनेमातून जातिभेदाचे व उच्चनीचतेचे वास्तव अत्यंत संवेदनशीलतेने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मांडले होते. त्यामुळे या सिनेमाच्या जागतिक प्रीमियरच्या निमित्ताने ‘झी’ मराठी वाहिनीने सामाजिक उपक्रमही हाती घेतला आहे.
‘लहान मुलांसाठी काम करणार्‍या दहा सामाजिक संस्थांची निवड करून त्यांच्या उत्तुंग कार्याची ओळख रसिकांना करून देण्यात येणार आहे. यात आदिवासी आणि अनेक वंचित मुलांसाठी काम करणारा विदर्भातील लोक बिरादरी प्रकल्प, अहमदनगर येथील विशेष मुलांसाठी कार्यरत करणारी ‘स्नेहांकुर’ व स्नेहालय संस्था, सोलापूर आणि दुर्गम भागात मुलांच्या शिक्षणासाठी काम करणारी ‘क्वेस्ट डॉट ऑर्ग इन’, गरीब मुलांचं जगणं सुकर करण्यासाठी झटणारी ‘एकलव्य बालशिक्षण व आरोग्यन्यास’ ही पुण्यातील स्वयंसेवी संस्था आदी दहा संस्थांचा या उपक्रमात सहभाग राहणार आहे.
फासेपारधी व भटक्या विमुक्त जमातीतील मुलांसाठी काम करणारी ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुल’, नर्मदेच्या खोर्‍यातील विस्थापितांच्या मुलांसाठी निवारा मिळवून देण्याकरता झटणारी ‘नर्मदालय’, डिस्लेक्सिया व मेंदूच्या क्षयाने पीडित मुलांसाठी काम करणारी ‘प्रीझम’, रस्त्यावरील मुलांसाठी काम करणारी ‘हमारा फाउंडेशन’ या आणि अशा दहा सामाजिक संस्था यात सहभागी होणार आहेत.
दिग्गज कलाकारांचा सहभाग

या उपक्रमात विक्रम गोखले, नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, अतुल कुलकर्णी, सचिन खेडेकर, अमोल गुप्ते, ऊर्मिला मातोंडकर, सोनाली कुलकर्णी, सचिन पिळगावकर, मकरंद देशपांडे हे मान्यवर कलाकार सक्रिय सहभाग घेत असल्याचे वाहिनीतर्फे सांगण्यात आले आहे.
सामाजिक उपक्रम
लहान मुलांसाठी काम करणार्‍या दहा सामाजिक संस्थांची माहितीही प्रेक्षकांना देणार