आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Thousand Crores Not Fill In Case Of Sugarcane

उसाची थकबाकी आता 10 हजार कोटींवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऊस गाळपाला झालेल्या विलंबामुळे गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या विपणन वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत देशातील साखर उत्पादन 17 टक्क्यांनी घसरून 115.4 लाख टनांवर आले आहे. साखरेची कमी किंमत आणि त्या तुलनेत उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे साखर कारखान्यांनाही आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चालू विपणन वर्षात शेतक-यांना देण्यात येणा-या उसाच्या किमतीच्या थकबाकीचा भार वाढून तो तीन हजार कोटी रुपयांवरून दहा हजार कोटी रुपयांवर गेला आहे.
यंदाच्या जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील साखर उद्योगांनी 115.4 लाख टन उत्पादन केले आहे. परंतु अगोदरच्या हंगामातील याच कालावधीत झालेल्या उत्पादनाच्या तुलनेत ते 16.6 टक्क्यांनी कमी आहे. मागील वर्षात 138.5 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते, अशी माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली आहे.
सर्वाधिक ऊस पिकणा-या महाराष्‍ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांसह एकूण देशातच ऊस गाळपाला विलंब झाल्यामुळे साखरेचे उत्पादन कमी झाल्याचे ‘इस्मा’ने म्हटले आहे. गेल्या 14-15 महिन्यांच्या तुलनेत साखरेच्या किमती घसरून किलोमागे सहा ते आठ रुपयांवर आल्या आहेत. साखरेच्या कमी झालेल्या किमतींमुळे कारखान्यांना कमी उत्पन्न मिळत असून उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. परिणामी शेतक-यांना उसाची किंमत देणे या कारखान्यांना जड जात असल्याचे ‘इस्मा’ने म्हटले आहे.
यंदाच्या जानेवारीअखेरपर्यंत उसाची थकबाकी जवळपास 10 हजार कोटी रुपयांवर गेली आहे. परंतु हा हंगाम पुढे सरकेल तशी थकबाकीची रक्कम वाढण्याची भीतीदेखील ‘इस्मा’ने व्यक्त केली आहे.
साखर उत्पादनाची स्थिती
राज्य ऑक्टो 13 - जाने 14 ऑक्टो 12- जाने 13
महाराष्‍ट्र : 40.75 लाख टन 48.5 लाख टन
उत्तर प्रदेश : 27.6 लाख टन 35.9 लाख टन