आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2005 Currency Notes Can Be Exchanged At Any Bank: RBI

कोणत्याही बँकेत जा आणि 2005 पूर्वीच्या नोटा बदलून घ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेने जुन्या नोटा बदलून देण्याबाबत सर्व बँकांना जारी केलेल्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2015 पर्यंत कोणत्याही बँकेतून 2005 पूर्वीच्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांसह सर्व नोटा बदलून मिळणार आहेत. किती नोटा बदलून द्यायच्या याबाबत रिझर्व्ह बँकेने कोणतीही र्मयादा घालून दिलेली नाही.

2005 पूर्वीच्या सर्व नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला असून या नोटा असलेल्या लोकांनी 1 जानेवारी 2015 पर्यंत नोटा बदलून घ्याव्यात असे सूचित केले आहे. यापूर्वी अशा नोटा बदलून देण्याची अंतिम मुदत 30 जून निश्चित करण्यात आली होती. 500 आणि 1000 रुपयांच्या दहापेक्षा जास्त नोटा बदलून देण्यासाठी नागरिकांना ओळखीचा पुरावा सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते.

नव्या निर्देशानुसार बँकेचे ग्राहक असलेल्या किंवा नसलेल्या सर्व नागरिकांना मुक्तपणे नोटा बदलून देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. किती नोटा बदलून द्यायच्या याबाबत कोणतेही बंधन नाही, बँकांनी 1 जानेवारी 2015 पर्यंत लोकांना मुक्तपणे नोटा बदलून द्याव्यात, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

जुन्या नोटा वैधच
2005 पूर्वीच्या सर्व नोटा वैध चलनी नोटा असून नागरिकांनी त्या नोटा व्यवहारात वापराव्यात आणि कोणताही किंतू मनात न बाळगता स्वीकाराव्यात, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

बँक काउंटर्स आणि एटीएममधून 2005 पूर्वीच्या सिरीजच्या नोटा जारी करणे बंद करावे, या नोटा बँकांना रिझर्व्ह बँकेकडे जमा कराव्यात, असे निर्देशही रिझर्व्ह बँकेने बँकांना दिले आहेत. सध्या 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनात आहेत.

कशा ओळखाल जुन्या नोटा
2005 पूर्वीच्या नोटा ओळखणे अगदी सोपे आहे. या नोटांच्या मागच्या बाजूला नोटा छापण्यात आल्याचे वर्ष छापलेले नाही. 2005 नंतर चलनात आणलेल्या नोटांच्या मागच्या बाजूला तळाशी त्या नोटा छापल्याचे वर्ष स्पष्टपणे दिसते.

रिझर्व्ह बँक ठेवणार लक्ष
लोकांना नोटा बदलून घेण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून रिझर्व्ह बँक पैसे काढणे आणि विनिमय प्रक्रियेवर देखरेख आणि पुनरावलोकन करणार आहे.