आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युच्युअल फंडापासून 36 लाख गुंतवणूकदार दूर !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - खातेधारकांच्या गळतीमुळे सध्या म्युच्युअल फंड उद्योगाला हैराण केले आहे. वैयक्तिक खात्याचा विचार करता मागील आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड उद्योगाला 36 लाख गुंतवणूकदार गमवावे लागले आहेत. गेल्या चार सलग आर्थिक वर्षांमध्ये म्युच्युअल फंड उद्योगातील गुंतवणूकदारांची संख्या घटत आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या अगोदरच्या तीन आर्थिक वर्षांमध्ये या उद्योगाने 15 लाख नवीन गुंतवणूकदारांची खाती बंद झाली आहेत.
भांडवल बाजार नियंत्रक ‘सेबी’कडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, देशातील 44 म्युच्युअल फंड कंपन्यांमधील नवीन गुंतवणूकदार खात्यांची संख्या 36.23 लाखांनी घटली आहे. 2011-12 वर्षातील 4.46 कोटी म्युच्युअल फंड खातेधारकांची संख्या यंदाच्या मार्चअखेर घसरून 4.28 कोटींवर आली आहे.


गेल्या चार वित्तीय वर्षांमध्ये 2012-13 पर्यंत म्युच्युअल फंड उद्योगाला 55 लाख नवीन गुंतवणूकदार गमवावे लागले आहेत. 2008-09 या वर्षाच्या अखेरपर्यंत म्युच्युअल फंड क्षेत्रातील खातेधारकांची संख्या 4.75 कोटी नोंद झाली होती. 2009-10 वर्षातील 4.8 कोटी खातेधारकांच्या तुलनेत त्यामध्ये 3.66 लाख नवीन गुंतवणूकदारांची भर पडली होती. परंतु त्यानंतर मात्र या खात्यांना गळती लागून गेल्या आर्थिक वर्षादरम्यान हा आकडा 4.28 कोटींवर आला आहे.
म्युच्युअल फंड कंपन्यांनी आणलेल्या विविध विलीनीकरण योजना, नफारूपी विक्री आणि अन्य काही कारणांमुळे या खातेधारकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असल्याचे मत भांडवल बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. गेल्या आर्थिक वर्षामध्ये समभाग योजनांमधील गुंतवणूकदारांची खाती 44.7 लाखांनी घटली असून कर्ज डेट फंडांच्या खात्यात मात्र विक्रमी वाढ होऊन ती 9 लाखांवर गेली आहे.


म्युच्युअल फंड उद्योगातील एकूण नवीन खात्यांमध्ये समभाग खात्यांचा वाटा हा जवळपास 70 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. परंतु मार्चअखेर समभाग निधीमधील गुंतवणूकदारांच्या खात्यात घसरण होऊन ती अगोदरच्या आर्थिक वर्षातल्या 3.76 वरून 3.31 कोटींवर आली आहे.


गुंतवणूकदार घटले अन् वाढलेही
सेबीकडे उपलब्ध माहितीनुसार डेट फंडातील एकूण गुंतवणूकदारांची खाती 8.9 लाखांनी वाढून ती मार्चअखेर 61.38 लाखांवर गेली आहे. त्याशिवाय एक्स्चेंज ट्रेड फंडातील गुंतवणूकदारांच्या संख्येत 1.15 लाखाची भर पडून याच कालावधीत ही संख्या 7.4 लाख गुंतवणूकदारांवर गेली आहे. समभाग आणि कर्ज या दोन्ही विभागात गुंतवणूक करणा-या बॅलन्स योजनांमधील 1.16 खातेदार घटले असून ही संख्या गेल्या आर्थिक वर्षात 26.02 लाखांवर आली आहे.