आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 41 New Crops Species Discovered Through Nuclear Technology By BARC

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अणुतंत्रातून विकसित झाल्या पिकांच्या 41 नवीन जाती, भाभा ऑटोमिक रिसर्चची कामगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरने आपल्या अणुतंत्रज्ञानावर आधारित कृषी कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध पिकांच्या 41 जाती विकसित करण्यात यश मिळवले आहे.


वाढती गरज आणि शेतजमिनींचा तुटवडा या पार्श्वभूमीवर देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायचे असेल तर न्यूक्लियर अ‍ॅग्रिकल्चर तंत्रज्ञानाचा अंगीकार करणे अनिवार्य आहे. आपल्या देशाला अन्नधान्य उत्पादनात वाढ करतानाच वाढत्या लोकसंख्येनुसार त्याचे समसमान आणि न्याय्य वितरण होते आहे की नाही याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे. यासाठी अणू किरणोत्सारावर आधारित तंत्रज्ञानाची मदत होऊ शकते याची माहिती ब-याच जणांना नसल्याने अणुतंत्रज्ञान शेती आणि जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश भागवत यांनी सांगितले. भारतीय जनसंपर्क परिषदेने आयोजित केलेल्या एका परिसंवादात ते बोलत होते.


भाभा ऑटोमिक रिसर्चच्या ट्रॉम्बे येथील अणू शेती आणि जैवतंत्रज्ञान विभागाने आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांतील शेती विद्यापीठांची मदत घेऊन विविध पिकांच्या तब्बल 41 जाती विकसित केल्या आहेत. विविध राज्यांतील शेतक-यांना व्यावसायिक तत्त्वावर पीक घेता यावे याकरिता त्या कृषी मंत्रालयाच्या राजपत्रित अधिसूचनेद्वारा प्रमाणित केल्या गेल्या आहेत. केळीच्या अतिशय उत्कृष्ट जातींच्या सूक्ष्म प्रजननाकरिता अनेक प्रोटोकॉल्सची निर्मिती केली आहे.


भागवत म्हणाले , किरणोत्सारांमुळे पिकांवर होणा-या परिणामांमुळे काही चांगले लाभ होत असून त्यात जनुकांमधील वैविध्यतेत होणा-या सुधारणांचा समावेश आहे. याची मदत घेऊन उत्पादन वाढवणे, रोगांना प्रतिबंध करणे, पीक लवकर पिकवणे, क्षारता किंवा पाण्याच्या दबावाला समोरे जाण्याची क्षमता वाढवणे शक्य आहे तसेच या माध्यमातून धान्ये, डाळी आणि तेलबिया यांच्या नव्या जाती विकसित करता येऊ शकतात.


याकडे त्यांनी लक्ष वेधले.
बीएआरसीच्या खाद्य तंत्रज्ञान विभागाचे मुख्य डॉ. अरुण शर्मा अणुविज्ञानांतर्गत कापणीपश्चात तंत्रज्ञानाबाबतचा अभ्यास अहवाल सादर करताना म्हणाले की, कितीही उत्पादन झाले तरी दीर्घकाळाकरिता अन्नधान्याचे संरक्षण आणि संवर्धन याकडेही लक्ष देणे गरजे असून त्यासाठी कापणीनंतरच्या नुकसानीला आळा घालणे महत्त्वाचे आहे.
फळे आणि भाज्यांच्या उत्पादनातील आपला देश दुस-या क्रमांकावर असल्याने निर्यात केल्या जाणा-या अन्नधान्यावरील किरणोत्सार प्रक्रियेचे महत्त्व जाणून त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे. पिकांवरील कीटकांचा प्रादुर्भाव कमी झाल्यास आंतरराष्‍ट्रीय स्तरावरील निर्यातीलाही चालना मिळेल असे शर्मा यांनी स्पष्ट केले.
या आहेत नवीन जाती : भुईमूग (15), मोहरी (3), सोयाबीन (2), सूर्यफूल (1), मूग डाळ (8), तूर (4) उडीद डाळ (5), चवळी (1), तांदूळ (1), ताग (1), सूर्यफूल (1)


निर्यातीला चालना मिळणार
शेतीतून घेतलेल्या पिकांवर किरणोत्सार प्रक्रिया केल्याने कोणत्याही प्रकारच्या रासायनिक प्रक्रियेला प्रतिबंध करता येईल. गॅमा रेडिएशन किंवा इलेक्ट्रॉन बीम रेडिएशनमुळे साठवून ठेवलेल्या धान्यातील कीटकांचा नायनाट करणे, ताज्या फळांच्या पिकण्यास विलंब करणे, बटाटा किंवा कांद्यामध्ये कोंब फुटण्यास आळा घालणे, अन्नधान्य सडवणा-या जीवाणूंचा-जंतूंचा नायनाट करणे सोपे होते, अशीही माहिती त्यांनी दिली.