आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या शहरांतील गुंतवणूकदारात 50% वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भांडवल बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवण्यासाठी बाजार नियंत्रक सेबी आणि सरकारने हाती घेतलेल्या योजनांना यश आले आहे. देशातील सर्वात मोठ्या राष्‍ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) छोट्या शहरांमधील गुंतवणूकदारांचा सहभाग जवळपास 50 टक्क्यांनी वाढला असल्याचे दिसून आले आहे.


राष्‍ट्रीय शेअर बाजाराकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षात या शेअर बाजाराच्या रोख बाजारपेठेच्या मंचावरून व्यवहार करणा-या एकूण किरकोळ गुंतवणूकदारांपैकी जवळपास 50 टक्के गुंतवणूकदार हे पहिल्या आणि दुस-या स्तरातील नाही तर अन्य शहरांतील आहेत. याच आर्थिक वर्षात किरकोळ गुंतवणूकदारांच्या माध्यमातून रोख बाजारपेठ मंचावरील व्यवहाराच्या एकूण उलाढालीपैकी जवळपास 43.7 टक्के उलाढाल ही देखील पहिल्या आणि दुस-या स्तरातील शहरांशिवाय इतर शहरांतून झालेली असल्याचे दिसून आले आहे.
बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, मुंबई ही प्रथम श्रेणीतील प्रमुख महानगरे असून द्वितीय स्तरातील शहरांमध्ये अहमदाबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ, नागपूर, पुणे आणि सुरत या शहरांचा समावेश होतो, पण राष्‍ट्रीय शेअर बाजारात व्यवहार करणारे किरकोळ गुंतवणूकदार हे या शहरांतील नाही तर अन्य शहरांमधील आहेत. भारतीय शेअर बाजाराबरोबरच देशाच्या विकास यशोगाथेवर किरकोळ गुंतवणूकदारांचा पूर्ण विश्वास असल्याचेच यातून दिसून आल्याचे राष्‍ट्रीय शेअर बाजाराने म्हटले आहे. देशातील या आघाडीच्या शेअर बाजाराने गेल्या आर्थिक वर्षात 27 लाख कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.


वाढीसाठी नवीन केंद्र
छोट्या शहरांमधील किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग म्हणजे वाढीसाठी नवीन केंद्र आहेत. देशाच्या सकल राष्‍ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत राष्‍ट्रीय शेअर बाजारातल्या रोख गटातील किरकोळ उलाढाल 2011- 12 वर्षातल्या 14.11 टक्क्यांवरून वाढून गेल्या आर्थिक वर्षात ती 19.66 टक्क्यांवर गेली आहे.