नवी दिल्ली - 'हमारा बजाज' म्हणत घरा-घरात पोहचलेल्या बजाज ऑटोने बाजारात
आपले स्थान मजबूत करण्यासाठी नवीन पाऊलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील काही वर्षांपासून बजाजच्या गाड्यांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे बाजारातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बजाजतर्फे सहा नवीन बाईक्स लॉंच करण्यात येणार आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सहा बाईक्स दर महिन्याला बाजारात लॉंच करण्यात येणार आहेत.
बाजारात नव्याने लॉंच करण्यात येणा-या बाईक्समध्ये बजाजतर्फे 100 सीसी ते 400 सीसीपर्यंतच्या बाइक्स लॉंच करण्यात येणार आहेत. यामध्ये बजाजच्या नव्या पलसर 400सीसीचा देखील सहभाग आहे.
पुढील सहा महिन्यांपर्यंत आम्ही प्रत्येक महिन्याला एक नवीन मॉडेल बाजारात लॉंच करणार आहोत अशी माहिती बजाज ऑटोचे अध्यक्ष एस रविकुमार यांनी सांगितले. 100 सीसी सेगमेंटमध्ये आम्ही व्हॅल्यू फॉर मनी बाइक प्लॅटिना आणि डिस्कव्हरचे नवीन मॉडेल्स लॉंच करणार आहोत. तसेच पल्सर 400 सीसी बाइकदेखील करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावर्षी एप्रिल ते डिसेंबर याकाळात बजाज ऑटोने 13,91,341 युनिट्सची विक्री केली आहे. तर मागच्या वर्षी याच कालावधित कंपनीने 16,05,308 यूनिट्सची विक्री केली होती. बाजारात बाजाजची सर्वात मोठी स्पर्धेक असणा-या हीरोच्या विक्रीमध्ये 7.16 टक्के वाढ झाल्याचे चित्र आहे. एप्रिल ते डिसेंबर या काळात हीरोने 43,40,986 यूनिट्सची विक्री केली आहे.
बजाज ऑटोतर्फे उचलण्यात आलेले हे पाउलं बाजारात कमी झालेले त्यांचे महत्व पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे मत काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले आहे. मार्चपर्यंत स्थानिक बाजारपेठेत बजाजच्या मार्केट शेअर्समध्ये 20 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा देखील बजाजचे नियोजन आहे.