आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकरदारांमुळे शहरांत कार विक्री वाढली, कंपन्यांच्या झकास अाॅफर्सवर पगारदार फिदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दोन वर्षांपासून असलेला दुष्काळ, त्यातच मार्चमध्ये अवकाळी पावसाने दिलेला तडका यामुळे अर्थव्यवस्थेचे चक्र मंदावल्याची चर्चा आहे. मात्र, याचा राज्यातील शहरांतील प्रवासी कार विक्रीवर काहीच परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे. मार्च-एप्रिलमध्ये राज्यात प्रवासी कार विक्रीत चांगली वाढ झाली आहे. कंपन्यांनी दिलेल्या विविध ऑफर्स, सवलती, पेट्रोलच्या तुलनेत कमी झालेल्या किमती, बँकांनी वाहन कर्जावरील व्याजात केलेली कपात, एक्स्चेंज ऑफर्स यामुळे महिन्याकाठी पगार मिळणा-या ग्राहक वर्गाने कार खरेदीला गती दिल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.

मागील तीस महिन्यांत प्रथमच कार विक्रीने विक्रीचा टॉप गिअर टाकला आहे. मारुती, ह्युंदाई, रेनॉ, फोक्सवॅगन आदी कंपन्यांच्या कारची मार्च-एप्रिलमध्ये चांगली विक्री झाली आहे. रेनॉसाठीचे महाराष्ट्र वितरक (नागपूर, नांदेड, नाशिक व औरंगाबाद विभाग) उन्नती मोटर्सचे सीईओ सतीश नायर यांनी सांगितले, रेनॉसाठी मार्च-एप्रिल हे महिने विक्रीच्या पातळीवर चांगले राहिले. नागपूर, नाशिक, औरंगाबाद व नांदेड या सर्व वितरण विभागात रेनॉच्या कारची चांगली विक्री झाली. लाॅजी व डस्टरला विशेष मागणी दिसून आली. जानेवारी ते मार्च हे महिने कार विक्रीसाठी कठीण मानले जातात. मात्र एप्रिलमध्ये विक्रीत वाढ झाल्याचे राज्यभरातील चित्र आहे.

ह्युंदाई कारचे मराठवाड्यातील आघाडीचे वितरक धूत-ह्युंदाईचे महाव्यवस्थापक विकास वाळवेकर यांनी सांगितले, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मार्च-एप्रिल मध्ये सेंटीमेंट पॉझिटिव्ह आहेत. पेट्रोलच्या किमती कमी होणे, कंपनांच्या वतीने देण्यात येणा-या विविध ऑफर्स, एसबीआयसह प्रमुख बँकांनी वाहन कर्जाचे कमी केलेले दर याचा सकारात्मक परिणाम कार विक्रीवर झाला आहे. मागणीत व चौकशीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात नोकरदारांचे प्रमाण जास्त आहे. एवढेच नव्हे तर ब-याच दिवसांनंतर कारसाठी वेटिंगचे बोर्ड झळकले आहेत. ह्युंदाईच्या इलाइट आय-२० साठी ६० दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. फोक्सवॅगनच्या औरंगाबाद वितरण विभागाचे महाव्यवस्थापक बालाजी तळेकर यांनीही असेच निरीक्षण नोंदवले. ते म्हणाले, जानेवारी ते एप्रिल या काळात कारच्या विक्रीने गती घेतली आहे. मागच्या वर्षीपेक्षा यंदा बरी परिस्थिती आहे. मार्चमध्ये आम्ही ५३ कारची विक्री केली आहे.

पाडवा, अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त फलदायी : सण आणि मुहूर्तामुळे कार खरेदी वाढल्याचे मत मारुती-सुझुकीचे वितरक पगारिया ऑटोचे सीईओ मनोज भट यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, मार्चमध्ये गुढीपाडवा आणि एप्रिलमध्ये अक्षय्य तृतीया या दोन मुहूर्तांवर ग्राहकांनी कार खरेदीला पसंती दिली. त्यामुळे मार्चमध्ये २०० हून जास्त तर एप्रिलमध्ये १५० हून जास्त कार विक्री झाल्या. ब-याच काळानंतर कार विक्री क्षेत्रात आता सकारात्मक वातावरण दिसते आहे.

२ वर्षांनंतर वेटिंग
गेल्या तीस महिन्यांपासून घसरणीनंतर कार विक्रीच्या गाडीने एप्रिलमध्ये टॉप गिअर पकडला. रेनॉ लॉजीसाठी एक ते दोन आठवडे वेटिंग आहे. ह्युंदाईच्या इलाइट आय-२० साठी ६० दिवस, मारुती डिझायरसाठी ३० ते ४५ दिवस वेटिंग करावी लागत आहे.

मार्च-एप्रिलमध्ये उंचावला कार विक्रीचा आलेख
>जानेवारी-फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च आणि एप्रिलमध्ये कारची विक्री वाढली आहे.
>फोक्सवॅगन औरंगाबादमधून जानेवारीत ३५ तर फेब्रुवारीत २५ कारची विक्री झाली होती.
>धूत ह्युंदाईमधून फेब्रुवारीत ४८ कारची विक्री झाली होती. मार्च-एप्रिलमध्ये त्यात दुपटीहून जास्त वाढ झाली.

ग्रामीण भागात मागणी घटली
ग्रामीण भागात मागणी घटल्याचे वितरकांनी सांगितले. लहरी निसर्गामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चक्र बिघडल्याने ट्रॅक्टर, एमपीव्ही, मोटारसायकलींची मागणी घटली आहे. एसयूव्हीच्या विक्रीत ३०% घट झाली.