आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेंद्र्यात ह्युंदाईची ४ हजार कोटी गुंतवणूक, दहा हजारांवर रोजगार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जगप्रसिद्ध ह्युंदाई कारचा भारतातला दुसरा उत्पादन प्रकल्प औरंगाबादच्या डीएमआयसीत येत अाहे. शेंद्रा येथे दीडशे एकर जागेवर ४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प येत असून त्यातून दहा हजार लोकांना थेट रोजगार मिळेल, अशी शक्यता
आहे. यासंदर्भातील करारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्याच्या उद्योग विभागाचे तीन बडे अधिकारी सेऊल (द. कोरिया) येथे तळ ठोकून आहेत. हा प्रकल्प बजाजप्रमाणे औरंगाबादला नवी भरारी मिळवून देईल. दिवाळीत याविषयीची अधिकृत घोषणा होणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

ह्युंदाई आणि तिच्याशी संलग्न किया मोटार्सच्या व्यवस्थापनासोबत गेल्या काही महिन्यांपासून बोलणी सुरू होती. या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी शेंद्रा येथील जागेची पाहणी करून प्रकल्प उभारणीची तयारी दाखवली. त्यानंतर उद्योग विभागाने तातडीने हालचाली करत उद्योग सचिव अपूर्व चंद्रा, एमआयडीसीचे सीईओ संजय सेठी, ऑरिक सिटीचे सीईओ विक्रम कुमार यांच्यावर जबाबदारी सोपवली. त्यानुसार ते ह्युंदाईच्या मुख्यालयात दाखल झाले आहेत.

प्रतिसाद लक्षात घेऊन?
मारुती सुझुकीखालोखाल ह्युंदाईला पसंती आहे. चेन्नई येथे १९९६ मध्ये ह्युंदाईचा भारतातील पहिला कार निर्मिती प्रकल्प सुरू झाला. कंपनीचा भारतातील मार्केट शेअर १७ टक्के असून सँट्रो मॉडेलने विक्रीत इतिहास घडवला. ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन कंपनीने विस्तारीकरणाचे बेत आखले आहेत.

शेंद्रा डीएमआयसीच का?
मुबलक जागा, कमी खर्चात कुशल मनुष्यबळ तसेच परिसरातील गावांचा भविष्यातील विकास लक्षात घेऊन ह्युंदाईने शेंद्रा डीएमआयसीला प्राधान्य दिले आहे. त्येथे वर्षाला किमान ३० लाख गाड्यांची निर्मिती २०३० पर्यंत सुरू होऊ शकते, असा अहवाल ऑरिकसिटीच्या प्रेझेंटेशनमध्ये शासनाने दिला.

डीएमआयसीला ब्रेक देणारा प्रकल्प..
२५-३० वर्षापूर्वी बजाज कंपनीच्या आगमनामुळे औरंगाबादचे अर्थकारण बदलले. आता चार हजार कोटींची गुंतवणूक आणि दहा हजार जणांना रोजगाराची क्षमता असलेल्या ह्युंदाईच्या प्रकल्पामुळे औरंगाबाद नव्याने भरारी घेईल. - सुभाष देसाई, उद्योग मंत्री
बातम्या आणखी आहेत...