आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पाऊस, दुष्काळाने एसयूव्हीच्या विक्रीला ब्रेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी… या कवितेत शांता शेळके यांनी ग्रामीण स्त्रीच्या मनोवस्थेचे यथार्थ वर्णन केले आहे. अशीच काहीशी अवस्था अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील प्रत्येकाची झाली आहे. अवकाळी पाऊस, गारपीट आणि दोन वर्षांपासून मुक्कामी असलेला दुष्काळ यामुळे अर्थचक्राला खीळ बसली आहे. ग्रामीण भागातील अर्थकारणावर अवलंबून असलेल्या स्पोर्ट््स युटिलिटी व्हेइकल अर्थात एसयूव्हीच्या व्यवसायाला अवकाळी पाऊस, दुष्काळ व गारपिटीचा जोरदार तडाखा बसला आहे. एसयूव्हीची विक्री ३० टक्क्यांनी घटली आहे.
महिंद्रा अँड महिंद्राचे अधिकृत वितरक रत्नप्रभा मोटर्सचे व्यवस्थापक राजेंद्र शुल्का यांनी सांगितले, महिंद्राचे एसयूव्हीचे सेगमेंट पूर्णपणे ग्रामीण भागावर अवलंबून आहे. दोन वर्षांपासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. त्यातच जानेवारीपासून अवकाळी पावसाने आणि गारपिटीने रब्बी हंगामाला फटका बसला. पावसाच्या लहरीपणामुळे एसयूव्ही खरेदीपासून बागायतदार शेतकरी सध्या दूर राहत आहेत. गाड्यांच्या चौकशीचे प्रमाण बऱ्यापैकी असले तरी पावसाचा अदमास घेऊन वाहन खरेदी करावी असा एकंदरीत कल आहे. औरंगाबाद येथील टाटा मोटर्सचे अधिकृत वितरक सान्या मोटर्सचे कार्यकारी संचालक मिलिंद पाटील यांनीही असेच निरीक्षण नोंदवले. ते म्हणाले, अपुरा पाऊस, अवकाळी पाऊस व गारपिटीने ग्रामीण अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे एसयूव्ही विक्री ३० टक्क्यांनी घसरली आहे.
पावसावर आशा टिकून : सध्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये काही प्रमाणात मंदी असली तरी आगामी काळात चांगल्या विक्रीची अपेक्षा आहे. यंदा पाऊसमान चांगले होण्याचा अंदाज असल्याने ऑगस्टपासून या क्षेत्रातील विक्रीला चांगले दिवस येतील, असे मिलिंद पाटील म्हणाले.
एसयूव्ही म्हणजे काय? : सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरिंग (सियाम) या वाहन क्षेत्रातील संघटनेच्या व्याख्येनुसार ज्या कारची लांबी ४ मीटरपेक्षा जास्त आहे, ज्याचे इंजिन १५०० सीसी किंवा त्याहून अधिक क्षमतेचे आहे, तसेच ग्राउंड क्लिअरन्स १७० मकमी किंवा त्याहून जास्त आहे अशा सर्व कार स्पोर्ट््स युटिलिटी अर्थात एसयूव्ही अंतर्गत येतात.
विक्रीत ३०% घट
महिंद्रा अँड महिंद्राचे औरंगाबाद व जालना जिल्ह्याचे वितरण आमच्याकडे आहे. गेल्या काही महिन्यांत दुष्काळ, अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे आमच्या एसयूव्हीची विक्री ३० टक्क्यांपर्यंत घसरली.
राजेंद्र शुक्ला, व्यवस्थापक, रत्नप्रभा मोटर्स, औरंगाबाद

पावसावरच गणित
अवकाळी पाऊस , दुष्काळामुळे आमच्याडे एसयूव्ही विक्रीत खूप फरक पडला आहे. आगामी काळात पाऊस चांगला झाल्यास विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सर्व गणित पावसावर अवलंबून आहे.
मिलिंद पाटील, कार्यकारी संचालक,
सान्या मोटर्स, औरंगाबाद

का बिघडले अर्थकारण
{ मार्चमध्ये अवकाळी पावसाने कहर केला. १ ते १८ मार्च या काळात राज्यात सामान्य प्रमाणाच्या तुलनेत ३,६७१ पट अधिक अवकाळी पाऊस झाल्याची नोंद भारतीय हवामान विभागाकडे आहे.
{ रब्बीचे प्रचंड नुकसान झाले. देशाच्या एकूण अन्नधान्य पुरवठ्यात रब्बीचा वाटा ५१ टक्के असतो.
{ अवकाळीनंतर उ. प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात भाजीपाल्याचे भाव ३० ते ४० टक्क्यांनी वाढले.
{ द्राक्षे, चिकू, मोसंबी, केळी व आंबा या प्रमुख फळपिकांना फटका. बागायती शेतकऱ्यांचे नुकसान.
{ अवकाळी पावसाने रब्बी धोक्यात आल्याने ग्रामीण अर्थचक्राला खीळ बसली.