Home »Business »Business Special» 0.5% Reduction In GST Growth Rate: IMF

नोटबंदी-जीएसटीने 0.5% कमी राहील विकास दर : आयएमएफ

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) भारताच्या विकास दराच्या अंदाजात घट केली असून इतर प्रमुख देशांसह जागतिक अर्थव्यवस्थेच्य

वृत्तसंस्था | Oct 11, 2017, 05:20 AM IST

  • नोटबंदी-जीएसटीने 0.5% कमी राहील विकास दर : आयएमएफ
वॉशिंग्टन -आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) भारताच्या विकास दराच्या अंदाजात घट केली असून इतर प्रमुख देशांसह जागतिक अर्थव्यवस्थेच्या अंदाजात मात्र वाढ केली आहे. २०१७ साठी भारताचा विकास दर ७.५ टक्के तर २०१८ मध्ये ७.७ टक्के राहील, असा अंदाज जुलै महिन्यात आयएमएफने व्यक्त केला होता.
मात्र, आता या वर्षी ६.७ टक्के आणि पुढील वर्षी ७.४ टक्के विकास दर राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे विकास दर कमी राहणार असल्याचे मत आयएमएफने आपल्या अहवालात व्यक्त केले आहे. जीएसटी आणि इतर पायाभूत सुधारणांमुळे पुढील काही वर्षांत विकास दर ८ टक्क्यांपेक्षा जास्त राहील, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर व्यापार करण्यासाठीचे वातावरण सुधारण्यासाठी कामगार आणि भूसंपादन नियमात सुधारणा करण्याची गरज असल्याचे मतही आयएमएफने व्यक्त केले आहे.
आयएमएफने वार्षिक बैठकीच्या आधी मंगळवारी जारी केलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या आढाव्यात ही माहिती दिली आहे. यात चीनचा विकास दर २०१७ मध्ये ६.८ टक्के आणि २०१८ मध्ये ६.५ टक्के राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजेच या वर्षी चीनचा विकास दर भारतापेक्षा जास्त राहील.
मात्र, पुढील वर्षी भारत पुन्हा एकदा तेजीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा दर्जा मिळवेल. जागतिक अर्थव्यवस्था या वर्षी ३.६ टक्के आणि २०१८ मध्ये ३.७ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आयएमएफने व्यक्त केला आहे. जुलै महिन्यात व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा हा ०.१ टक्क्यांनी जास्त आहे. चीन, जपान, रशिया आणि काही युरोपीय देशांत परिस्थिती सुधारत असल्याने यात दुरुस्ती करण्यात आली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत तेजीने सुधारणा होत असल्याचे आयएमएफचे आर्थिक सल्लागार आणि संशोधन संचालक मॉरिस ऑब्सफेल्ड यांनी
म्हटले आहे.
पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीची आज बैठक
पंतप्रधानांच्या नव्या आर्थिक सल्लागार समितीची पहिली बैठक बुधवारी होणार आहे. यामध्ये विकास दर वाढवण्याबरोबरच इतर आव्हांनाबाबत विचार होणार आहे. नीती आयोगाचे सदस्य विवेक देबराय या समितीचे अध्यक्ष आहेत. गेल्या महिन्यातच २६ सप्टेंबर रोजी या समितीची स्थापना झाली होती.

Next Article

Recommended