आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळणे आता होणार अनिवार्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली -देशातील साखर उद्योगासमोरील संकट कमी करण्यासाठी सरकारच्या वतीने पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनाॅल मिसळणे अनिवार्य करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे इथेनॉल उत्पादनाला चालना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर उत्पादकांना कायमस्वरूपी संकटातून बाहेर काढण्यासाठी इथेनॉल उत्पादनाला चालना देणे आवश्यक असल्याचे नुकतेच सांगितले होते. या संदर्भात त्यांनी साखर उत्पादकांची एक बैठक देखील घेतली होती. त्यानंतरच पेट्रोलियम मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. सध्या साखर उत्पादकांवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे १४,३९८ कोटी रुपयांचे देणे आहे. सध्याच्या नियमानुसार पेट्रोलमध्ये पाच टक्के इथेनॉल मिळवणे अनिवार्य आहे. मात्र, कंपन्या फक्त २ टक्के मिश्रण करतात.
साखर उत्पादकांना वर्ष २०१५-१६ (ऑक्टोबर ते सप्टेंबर) पासून इथेनॉल उत्पादन वाढवण्याचे सांगण्यात येणार आहे. यामुळे पेट्रोलमध्ये १० टक्के मिश्रण करण्यासाठी २३० कोटी लिटर इथेनॉल उपलब्ध होण्यास मदत मिळेल. याचप्रमाणे तेल कंपन्यांना देखील मिश्रण करण्यासाठी १० टक्के इथेनॉल खरेदी करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत.
देशात होत असलेले अतिरिक्त साखरेचे उत्पादन कमी करण्यासाठी तसेच या क्षेत्रासमोर वाढत असलेल्या संकटातून सुटका करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

व्यावसायिक नफा
देशात साखरेचे उत्पादन वाढल्यामुळे साखरेचे भाव कमी होत आहेत. त्यामुळेे अतिरिक्त साखर उत्पादन केल्याऐवजी चांगल्या दर्जाचे इथेनॉल बनवणे हे व्यावसायिकदृष्ट्या नफ्याचे ठरू शकते. साखरेतून मिळालेल्या इथेनॉलच्या माध्यमातून प्रतिलिटर ४८ ते ४९ रुपयांचा नफा मिळवता येतो. सध्याच्या स्थितीत साखरेचे भाव कमी झाल्यामुळे कारखानदारांना लागणारा खर्चदेखील मिळत नाही. सध्या कारखाने २० रुपये प्रतिकिलोप्रमाणे साखर विकत आहेत.

उत्पादन कमी
साखर उत्पादक कारखान्यांनी साखरेऐवजी इथेनॉलचे उत्पादन घेणे पसंत केले नसल्याने देशात इथेनॉल उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे तेल कंपन्यांनी आतापर्यंत फक्त ८२ कोटी लिटर इथेनॉलचा करार केला आहे. सध्याच्या नियमानुसार ५ टक्के इथेनॉल मिक्स करण्यासाठी कंपन्यांना १३३ कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता आहे. म्हणजेच गरज असलेल्या इथेनॉलपेक्षा हे प्रमाण ३८.३५ टक्के कमी आहे.