आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापाऱ्यांना लिलावात सहभागी होण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक, अमरावती, बुलडाणा, वाशीम, चिखली, यवतमाळ- शेतकरी, ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या व्यापाऱ्यांना बाजार समितीने २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांचे बाजार समितीतील परवाने, गाळे आणि गोदामे जप्त करण्यात येणार आहेत.

व्यापाऱ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या आडतीमुळे व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. परिणामी नाशिक जिल्ह्यात दरदिवशी २५ ते २७ कोटींची उलाढाल ठप्प झाली. बाजार समित्यांनी सोमवारी नोटिसा बजावत लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने, गाळे आणि गोदामे जप्त करण्याचा इशारा दिला. राज्य शासनाच्या िनर्णयाविरोधात राज्यातील व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, सुरत, अहमदाबाद, इंदूर, बडोदा या शहरांतील ग्राहकांना भाजीपाल्याची टंचाई भासणार आहे. ही टंचाई भासू नये, शिवाय व्यापाऱ्यांनी गोंधळ घालू नये यासाठी सोमवारी पोलिस बंदोबस्तात भाजीपाल्याची विक्री सुरू होती. नाशिक ‘कृउबा’ समितीमध्ये ७०० ते ८०० वाहनांमधून भाजीपाला विक्रीसाठी येतो. मात्र, लिलाव बंद असल्याच्या माहितीमुळे केवळ ८५ वाहनांतून भाजीपाला विक्रीसाठी आला. जिल्ह्यात नाशिक, लासलगाव आणि पिंपळगाव या प्रमुख बाजार समित्या आहेत. भाजीपाला, कांदा, डाळिंब, बटाटा, टोमॅटो यांची मोठ्या प्रमाणात खरेदी- विक्री होते. जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांची उलाढाल ठप्प झाली आहे. दरम्यान, शासनाचा िनर्णय चांगला असून बाजार समितीत आडत घेतली जाणार नसल्याचे नाशिक ‘कृउबा’ समितीचे सचिव अरुण काळे यांनी सांगितले.
नवी मुंबई कांदा-बटाटा मार्केट ठप्प : बेमुदत संपामध्ये सोमवारी नवी मुंबईतील कांदा-बटाटा मार्केटही सहभागी झाले. दैनिक २०० गाड्यांची आवक असलेल्या कांदा- बटाटा मार्केटमधे आवकच झाली नाही. आता मंगळवारपासून फळे आणि भाजीपाला व्यापारी संपात सहभागी होणार आहेत. व्यापारी आणि सरकार यांच्यात झालेल्या चर्चेत काहीही तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, आमचा शेतकऱ्यांना विरोध नसून बाजार समितीला नियमन मुक्त करावे या मागणीसाठी आम्ही सामुदायिक रजा आंदोलन सुरू केल्याचे नवी मुंबई ‘कृउबा’ समितीतील कांदा व्यापारी संजय पिंगळे यांनी सांगितले.
थेट विक्रीतून काहींना फायदा, परंतु अनेकांनी माल परत नेला
व्यापाऱ्यांचा बंद असल्याने शेतीमालाला दर कमी मिळत आहे. पण आडतीपासून मुक्तता हा शासनाने चांगला निर्णय घेतल्याचे नाशिक येथील शेतकरी भूषण जाधव, निवृत्ती न्याहारकर यांनी म्हटले. जो व्यापारी चांगला भाव देईल शेतकरी तिकडेच जाणार असल्याचे बुलडाण्याचे शेतकरी सुभाष शिंदे यांनी सांगितले. तर चिखली येथील रमेश थुट्टे यांचा विकला न गेल्याने घरी घेऊन जावा लागला. राज्य सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी भरडला जात असल्याचे यवतमाळ येथील अजय चव्हाण यांनी म्हटले. घाटलाडकी, चांदूर बाजार येथील धनंजय वानखेडे यांनी मात्र थेट विक्रीतून फायदा झाल्याचे सांगितले.
व्यापारी म्हणतात, शेतकऱ्यांना मिळतात लवकर पैसे
बाजार समितीत माल दिल्यानंतर शेतकऱ्यांना सायंकाळच्या आत पैसे दिले जातात. वास्तविक अाडत्यांना माल उधारीत द्यावा लागतो. आता शासनाचे धाेरणच निश्चित नसल्याचे व्यापारी विठ्ठल येवले यांनी सांगितले. नवीन धोरणानुसार शेतीमाल खरेदीची अाडत व्यापाऱ्यांकडून घेण्यात येणार आहे. हा निर्णय व्यापाऱ्यांवर अन्याय करणारा असल्यामुळे खरेदी बंदचा निर्णय घेण्यात आला असला तरी पुणे पणन महासंघासोबत व्यापारी संघटनांची चर्चा सुरू आहे. यानंतर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे वाशीम येथील अाडत व्यापारी सुरेश भोयर यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...