आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँकांमध्ये १५% वेतनवाढ, बँक कर्मचारी संघटना, आयबीएच्या करारावर स्वाक्षऱ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सरकारी बँकांसह देशातील ४३ बँकांच्या सुमारे १० लाख कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ मिळणार आहे. सोमवारी बँक कर्मचारी संघटना व इंडियन बँक असोसिएशनने (आयबीए) करारावर स्वाक्षऱ्या केल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांची पगारवाढीची दीर्घकाळापासूनची प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे.
आयबीएचे अध्यक्ष टी.एम. भसीन यांनी ही माहिती दिली. १ नोव्हेंबर २०१२ पासून कर्मचाऱ्यांना सुधारित पगार लागू होईल. या ४३ बँकांत २५ सरकारी बँका, ११ खासगी क्षेत्रातील बँका व ७ परदेशी बँका आहेत. १५ टक्के पगारवाढीमुळे बँकांवर ४,७२५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. त्यात निवृत्ती वेतनाची रक्कम मिसळली तर एकूण बोजा ८३७० कोटी रुपये होतो. याशिवाय बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई, निवास, शैक्षणिक, विशेष आणि इतर भत्त्यांतही सुधारणा झाली आहे.
७.७५ ते ११ % विशेष भत्ता
बँक अधिकाऱ्यांना महागाई भत्त्याबरोबरच मूळ वेतनावर ७.७५ ते ११ टक्के तर कर्मचाऱ्यांना ७.७५ टक्के विशेष भत्ता.
थकबाकी लगेचच हाती येणार
कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीनुसारची थकबाकी लगेच तर अधिकाऱ्यांना मात्र पुढच्या ४ ते ६ महिन्यांत ही थकबाकी मिळेल.
नवीन आरोग्य विमा योजनेअंतर्गत बँक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्चही मिळेल. त्यासाठी ३ ते ४ लाख रुपये कौटुंबिक विमा संरक्षणाच्या एकत्रित योजना घेण्यात आल्या आहेत.
अशी मिळेल पगारवाढ
अधिकारी
सध्याची वेतनश्रेणी - रु. १४५००- ५२०००
सुधारित वेतनश्रेणी - रु. २३,७००-८५०००
बिगर अधीनस्थ कर्मचारी
सध्याची वेतनश्रेणी - रु. ७२००- १९,३००
सुधारित वेतनश्रेणी - रु. ११,७६५-३१,५४०
अधीनस्थ कर्मचारी
सध्याची वेतनश्रेणी - ५,८५०-११,३५०
सुधारित वेतनश्रेणी - ९,५६०-१८,५४५
औरंगाबादेत कर्मचाऱ्यांना मिळणार ६० कोटी
औरंगाबादेत ३, तर मराठवाड्यात ७०० कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल. त्यांच्या खिशात महिनाभरात किमान ६० कोटी रुपये येतील. थकबाकीपोटी कारकून संवर्गाला ८० हजार ते २.५ लाख व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना ६० हजार ते १. ८० लाख रुपये मिळतील.
दुसऱ्या-चाैथ्या शनिवारी सुटी
बँक कर्मचारी संघटना आणि आयबीएमध्ये झालेल्या करारानुसार बँक कर्मचाऱ्यांना लवकरच महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटी मिळणार आहे. पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी बँकांमध्ये नियमित कामकाज होईल. रिझर्व्ह बँकेने या सुट्यांना मंजुरी दिली आहे. सरकारकडून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. तीन ते चार आठवड्यांत या सुट्या सुरू होतील, असे भसीन म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...