आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल मार्केटिंगमध्ये दरवर्षी 4 लाख नव्या रोजगाराच्या संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या इंटरनेट हा लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. इंटरनेटच्या विस्तारामुळेच यास एका उत्तम बाजारपेठेचा आकार येत आहे. यातून व्यापार विस्तारासाठी विविध पद्धतीने मार्केटिंग आणि जाहिरात करुन प्रसिद्धी मिळवण्याचे प्लॅटफॉर्म तयार झाले आहे. स्मार्टफोनमुळे मार्केटिंगचे क्षेत्र सोपे झाले आहे. मागील काही वर्षांत डिजिटल मार्केटिंगचा वेगाने विस्तार होऊन रोजगार वाढले आहेत. 

२०१६ मधील एका अहवालानुसार, डिजिटल मार्केटिंगमध्ये २०२० पर्यंत १५ लाख नवे रोजगार येतील. अर्थात सध्या दरवर्षी सरासरी ४ लाख नव्या रोजगाराच्या संधी आहेत. एका अहवालानुसार, २०१८ मध्ये कंपन्यांकडून प्रसिद्धीसाठी ८ अब्ज डॉलर खर्च केला जाईल. यातील १.७८ अब्ज डॉलर डिजिटल जाहिरातींवर व १ अब्ज डॉलर मोबाइल इंटरनेट जाहिरातींवर खर्च करण्यात केले जाईल. तर, २०१९ मध्ये प्रसिद्धीसाठी केल्या जाणाऱ्या ८.५० अब्ज डॉलरच्या एकूण खर्चापैकी २.१७ अब्ज डॉलर डिजिटल जाहिरातींवर आणि १.२३ अब्ज डॉलर मोबाइल इंटरनेट जाहिरातींवर खर्च करण्यात येतील. डिजिटल मार्केटिंग झपाट्याने वाढण्याचे एक मोठे कारण म्हणजे यावर अत्यल्प खर्च येतो. किमान २ हजार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ब्रॉडकास्ट मीडियात १५० डॉलर, वर्तमानपत्रात २५० डॉलर खर्च येतो. तर, इंटरनेट सर्चच्या माध्यमांतून २ हजार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त ५० डॉलर व सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून ७५ डॉलरचा खर्च येतो. त्यामुळे कंपन्यांसाठी प्रसिद्धीचे हे माध्यम स्वस्त व अधिक प्रभावी आहे. त्यामुळेच कंपन्या या क्षेत्रात विविध व्यावसायिकांना संधी देत आहेत. यात कंटेंटपासून वेब डेव्हलपरपर्यंतच्या व्यावसायिकांची गरज आहे.   

डिजिटल मार्केटिंग व्यवस्थापक  
डिजिटल मार्केटिंगच्या अव्वल दोन पदांपैकी हे एक असून यासाठी किमान ५ ते ७ वर्षांच्या कामाचा अनुभव लागतो. डिजिटल मार्केटिंग मॅनेजरकडे संपूर्ण मार्केटिंग डेव्हलपमेंट पाहणे, धोरण ठरवणे तसेच संकेतस्थळ प्रभावी बनवण्याची जबाबदारी असते. कंपनीत डिजिटल मार्केटिंगची जबाबदारीही यांच्यावरच असते.  

सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह आणि सोशल मीडिया मॅनेजर  
सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह आणि सोशल मीडिया मॅनेजर सोशल मीडियावरील बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवतात आणि त्यानुसार कंटेंट टीमसोबत नियोजन करतात. हा चमू एकत्रितपणे ग्राहकांसाठी उच्च दर्जाचा मजकूर आणि व्हिडिओ सादर करतात. तथापि, याच्यासाठी कोणताही अभ्यासक्रम किंवा पदवी नसते. काही संस्थांमध्ये याचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे. शिवाय, वेब पत्रकारितेच्या अनुभवानंतर या क्षेत्रात करिअर करता येऊ शकते. यासाठी जनसंवाद किंवा पत्रकारितेचा पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम करता येईल. काही वर्षांपर्यंत कंटेेंट डेव्हलपमेंटचा अनुभव घेतल्यानंतर सोशल मीडियावर मॅनेजर बनता येऊ शकते. पदवीनंतर एमबीए करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च पदांसाठी प्राधान्य दिले जाते.  

वेब डेव्हलपर आणि वेब डिझायनर  
वेब डेव्हलपर आणि वेब डिझायनरकडे संकेतस्थळ बनवणे तसेच त्याची देखभाल करण्याची जबाबदारी असते. प्रेक्षकांना अधिकाधिक व्यग्र ठेवेल असे संकेतस्थळ त्यांना बनवावे लागते. यासाठी जावा स्क्रिप्ट, जॅक्वेरी, एचटीएमएल, सीएसएस, वेब प्रोग्रामिंगची माहिती असावी लागते. बारावीनंतर कॉम्प्युटर सायन्समधून पदवीधर वेब डिझायनिंग किंवा वेब डेव्हलपमेंटची अतिरिक्त पदविका घेऊन या क्षेत्रात करिअर करता येऊ शकते.  

अन्य काही संबंधीत रोजगार  
हे कार्यक्षेत्र अत्यंत व्यापक आहे. डिजिटल मार्केटिंग मॅनेजर, सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह आणि वेब डिझायनरसोबतच अन्यही अनेक रोजगार या क्षेत्रात आहेत. यात अॅनालिटिकल मॅनेजर, सीआरएम मॅनेजर, ई-मेल मार्केटिंग मॅनेजर आणि ई-कॉमर्स मॅनेजर या पदांचाही समावेश असतो.  

वरिष्ठ स्तरावर १० लाख रुपयांपेक्षा अधिक पॅकेज मिळण्याची शक्यता  
या क्षेत्रात कंटेंट रायटरला अनुभवानुसार २.५ लाख ते ५ लाखांपर्यंतचा वार्षिक पॅकेज मिळू शकतो. त्यानंतर सोशल मीडिया मॅनेजरला ४ ते ७ लाख रुपये, वेब डिझायनर किंवा वेब डेव्हलपरला ३ ते ५ लाख रुपये आणि डिजिटल मार्केटिंग मॅनेजरला अनुभवानुसार ४ ते १० लाख रुपयांचा वार्षिक पॅकेज मिळू शकतो.