आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; राज्यात 400 कोटींंची उलाढाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दोन लाखांपर्यंतच्या खरेदीला केवायसीची आवश्यकता नसल्याचे सरकारने नुकतेच स्पष्ट केले.  जोडीला सोने-चांदीच्या स्थिर किमती व सराफांच्या सवलती यामुळे  धनत्रयोदशीला सराफ बाजारात  सकारात्मक वातावरण निर्माण होऊन मुंबईसह राज्यात सोने खरेदीसाठी झुंबड उडाली. ग्राहकांचा खरेदीचा उत्साह बघता गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्याची विक्रमी खरेदी होऊन राज्यात ४०० कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला.  

सणासुदीचा हंगाम वगळता राज्यात अन्य दिवशी १०० ते १५० कोटींची सोने विक्री होते. परंतु पॅनकार्ड सक्ती शिथिल केल्याने दिलासा मिळाला आहे. सराफ बाजारातील मरगळ दूर होऊन ग्राहक सोने खरेदीसाठी बाहेर पडले. सकाळपासूनच दुकानांमध्ये गर्दी केली. यंदा धनत्रयोदशीला ३० टक्के जास्त विक्री  होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षातल्या ३५० कोटी रुपयांच्या तुलनेत या वर्षी धनत्रयोदशीला राज्यातील उलाढाल ४०० कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी व्यक्त केला. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यात करण्यात आलेले सकारात्मक बदल तसेच दोन लाख रुपयांपर्यंतच्या खरेदीसाठी पॅनकार्ड सादर करण्यासाठी देण्यात आलेली मुभा यामुळे  ग्राहकांमधील खरेदीची साशंकता दूर झाली. त्यामुळे ग्राहक पुन्हा सराफ पेढ्यांकडे येऊ लागले आहेत.  त्यामुळे केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागातील ग्राहक सोन्याची नाणी, दागिने, हिऱ्याचे दागिने चांगल्या प्रकारे खरेदी करीत आहे. सातव्या वेतन आयोगामुळेदेखील ग्राहकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल झाला आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत सोन्याची विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत २० ते ३० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे संचालक सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केला.  

दागिने खरेदीकडे ओढा   
धनत्रयोदशीसारख्या पवित्र दिवशी ग्राहक  सोन्याचे बिस्कीट, वळी, नाणी खरेदी करतात.  नोव्हेंबरपासून लग्नसराईचा हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे पुन्हा दागिने घडणावळीचा भुर्दंड टाळण्यासाठी ग्राहकांनी दागिने खरेदीवर भर दिला आहे. मोठ्या दागिन्यांना चांगली मागणी असल्याचे जैन म्हणााले.

स्थिर भाव पथ्यावर   
सणासुदीत मौल्यवान धातूचे भाव वधारतात. सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला २९हजार ६०० रुपये होता. चांदीचा भाव प्रतिकिलोला ४१ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. यंदाच्या खरेदी हंगामात सोने व चांदीचे भाव स्थिर असून त्याचाही ग्राहकांवर सकारात्मक परिणाम झाला असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.

तरुण वर्गाचीही खरेदी 
यंदाच्या वर्षी महिलांनी हलके दागिने, गळ्यातील हार, अंगठी, हिऱ्याचे दागिने खरेदी करण्यास पसंती दाखवली आहे. तरुण वर्गाचा कल चांदीची नाणी आणि विविध प्रकारच्या मूर्ती खरेदी करण्याकडे असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले
बातम्या आणखी आहेत...