आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार करणार आणखी 5000 टन तूरडाळ आयात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पुढील महिन्यात देशातील बाजारात डाळींचा पुरवठा वाढवण्यासाठी तसेच डाळींच्या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारच्या वतीने ५,००० टन तूरडाळ आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सरकारी कंपनी एमएमटीसीने टेंडर काढले आहे. कमी भावात मिळाल्यास आणखी डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. सरकारी आकडेवारीनुसार वर्ष २०१५ मध्ये देशातील कडधान्याचे उत्पादन थोडे वाढले आहे. मात्र, तरीदेखील किमती १८० रुपये प्रतिकिलोवर कायम आहेत.

सलग दुसऱ्या वर्षी कडधान्य उत्पादन कमी होण्याची शक्यता पाहता अन्नधान्य ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी नुकतेच वाणिज्य मंत्रालयाला डाळी आयात करण्याचा आग्रह केला होता. आयात केलेली डाळ जेएनपीटी, मुंबई आणि चेन्नई बंदरावर सात फेब्रुवारी ते १५ मार्च दरम्यान आली पाहिजे. यासाठी १८ जानेवारीपर्यंत टेंडर भरता येणार आहे. यात बोली कमीत कमी २,००० टनांची हवी आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशा, आसाम आणि काही उत्तर-पूर्व राज्यांमध्ये कडधान्याची पेरणी कमी झाली आहे.

गेल्या वर्षीदेखील आयात
एमएमटीसीने गेल्या वर्षीदेखील डाळींच्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी ५,००० टन तूरडाळ आयात केली होती. तसेच उडीद डाळ आयात करण्यासाठीही टेंडर जाहीर करण्यात अाले होते. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता.