आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेक्ट्रम तसेच रिअल इस्टेट विक्रीमधून मार्चपर्यंत आरकॉम फेडणार 86% कर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रिलायन्स कम्युनिकेशनने बँकांचे कर्ज फेडण्यासाठी एक नवीन प्रस्ताव तयार केला आहे. कंपनीचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेमध्ये या प्रस्तावाची माहिती दिली. आरकॉमवर सुमारे ४५,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. कोणत्याही कर्जाचे रूपांतरण शेअरमध्ये करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बँकांनाही कोणत्याही कर्जाला “राइट ऑफ’ करण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यांनी नवीन गुंतवणूकदार गुंतवणुकीस तयार असल्याचेही सांगितले. मात्र, त्यांचे नाव सांगितले नाही. या पूर्ण प्रक्रियेनंतर कंपनीवर केवळ ६,००० कोटी रुपयांचे कर्ज राहणार असल्याचे अंबानी यांनी सांगितले. म्हणजेच सुमारे ८६ टक्के कर्ज कमी होईल.  


आरकॉमने गेल्या महिन्यातदेखील कर्जाची परतफेड करण्यासाठी एक प्रस्ताव दिला होता. यामध्ये “स्ट्रॅटेजिक डेट रिस्ट्रक्चरिंग’अंतर्गत ७००० कोटींच्या कर्जाला शेअरमध्ये बदलण्यात येणार होते. या बदल्यात बँकांना ५१ टक्के शेअर देण्यात येणार होते. हा करार रद्द करण्यात आला आहे. कंपनीने सुमारे ३५ भारतीय आणि जागतिक बँकांकडून कर्ज घेतलेले आहे. सर्व बँकांची एकाच पर्यायावर मंजुरी मिळवणे खूपच आव्हानात्मक काम असल्याचे अनिल अंबानी यांनी सांगितले.  


नवी मुंबईमधील धीरूभाई अंबानी नॉलेज सिटीमध्ये चायनीज बँकेला ७० टक्के भागीदारी देण्यात येणार आहे. यामुळे कंपनीचे कर्ज १०,००० कोटी रुपयांनी कमी होईल. या रिस्ट्रक्चरिंगनंतर आरकॉमचे इंटरप्राइज मूल्य १५,००० कोटी रुपये होईल, असा अंदाज क्रेडिट सुइसने व्यक्त केला आहे. कंपनीने नोव्हेंबर महिन्यामध्ये टू-जी बिझनेस बंद करण्याची तसेच व्हीकॉम मीडियाची डीटीएच उपकंपनी आणि रिलायन्स बिग टीव्ही विक्री करण्याची घोषणा केली होती. 

 

> नव्या आरकॉमचे मूल्य होईल १५,००० कोटी रुपये होईल, विदेशातून येईल ५० टक्के महसूल

 

समितीच्या देखरेखीखाली होईल सर्व मालमत्तांची विक्री 
स्पेक्ट्रम, टॉवर, रिअल इस्टेट आणि ऑप्टिकल फायबर अॅसेटच्या विक्रीतून बँकांचे १७,००० कोटी रुपये भरण्यात येणार आहे. विक्रीवर देखरेख करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंदडा या समितीचे अध्यक्ष आणि दूरसंचार नियामक ट्रायचे मेंबर या समितीचे सदस्य असतील. विक्री करण्याचे काम ४० दिवसांत पूर्ण केले जाईल. 

 

अर्धे स्पेक्ट्रम आणि पाच शहरांतील मालमत्ताची विक्री 
८००, ९००, १८०० आणि २१०० मेगाहर्ट््झ बँडमध्ये कंपनीकडे २६२ मेगाहर्ट््झ स्पेक्ट्रम आहे. यामधील १२२.४ मेगाहर्ट््झ स्पेक्ट्रमची विक्री करण्यात येणार आहे. ४३,००० टॉवर, १७८,००० किलोमीटर फायबर, २४८ मीडिया कन्वर्जेंस नोडचीही विक्री करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त दिल्ली, चेन्नई, कोलकाता, जिगनी आणि तिरुपतीमधील रिअल इस्टेटचही विक्री करण्यात येईल. 

 

दिवाळखोरीची तक्रार करणाऱ्या चायनीज बँकेशी तडजोड  
या नव्या प्रस्तावाला चायना डेव्हलपमेंट बँकेची देखील सहमती आहे. या बँकेने आरकॉमला सुमारे १२,००० कोटी रुपयांचे कर्ज दिलेले आहे. कर्जाची परतफेड झाली नसल्याने बँकेने राष्ट्रीय कंपनी कायदा लवादामध्ये (एनसीएलटी) आरकॉमच्या विरोधात दिवाळखोरीचे प्रकरण दाखल केले होते. सोमवारी बीजिंगमध्ये आरकॉमने या बँकेसोबत न्यायालयाच्या बाहेर तडजोड केली.  

 

आरकॉम बिझनेस-टू-बिझनेस कंपनी  
पुढील काळात आरकॉम केवळ बिझनेस-टू-बिझनेस कंपनी राहणार असल्याचे अंबानी यांनी सांगितले. कंपनी इंटरनेट डेटा सेंटरच्या बिझनेसमध्ये राहील. या व्यतिरिक्त कंपनी जगातील सर्वात मोठी खासगी सबमरीन केबल नेटवर्क कंपनीही कायम राहणार आहे. या व्यवसायात कंपनीला नफा होत असून पुढील काळातही या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. 

 

शेअरमध्ये ४१% तेजी, ३१% वाढीसह बंद  
कर्जाच्या परतफेडीची घोषणा होताच आरकॉमच्या शेअरमध्ये ४१% पर्यंतची वाढ झाली. दिवसभराच्या व्यवहारानंतर ३०.७८ टक्क्यांच्या वाढीसह २१.३३ रुपयांवर शेअर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात या शेअरमध्ये ३१.९० टक्के तेजी राहिली आणि अखेरचा व्यवहार २१.५० रुपयांवर झाला. कंपनीचा मार्केट कॅप १,३८८.८८ कोटी रुपयांनी वाढून ५,८९८.८८ कोटी रुपये झाला.

बातम्या आणखी आहेत...