आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- बाबा रामदेव यांच्या नेतृत्वातील पतंजली आयुर्वेदाने ई-कॉमर्स बाजारात प्रवेश केला आहे. पतंजलीची एफएमसीजी उत्पादने आता अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या पोर्टलवरही मिळतील. त्यासाठी आठ ई-कॉमर्स कंपन्यांसोबत करार करण्यात आला आहे. यात अॅमेझॉन, फ्लिपकार्टव्यतिरिक्त बिग बास्केट, ग्रोफर्स, पेेटीएम मॉल, शॉपक्लूज, नेटमेड्स आणि वन एमजी यांचा समावेश आहे. या साइटवर पतंजलीची सर्व उत्पादने उपलब्ध असतील.
बाबा रामदेव यांनी या कराराला ‘हरिद्वार से हर द्वार’ असे घोषवाक्य दिले आहे. पतंजली ऑनलाइन बाजारात आल्याने जास्त लोकांपर्यंत उत्पादने पोहोचणार असल्याचे ते म्हणाले. लोकांना सहज उत्पादने खरेदी करता येतील. पाच जानेवारी १९९५ रोजी स्थापन पतंजली आयुर्वेद केवळ २३ वर्षांतच ५०,००० कोटी रुपये मूल्याच्या उत्पादन क्षमतेसह एफएमसीजी क्षेत्रातील सर्वात प्रमुख कंपनी बनली आहे. ते म्हणाले की,”हरिद्वार आणि तेजपूर (आसाम) मध्ये मोठ्या प्रकल्पानंतर नोएडा, नागपूर आणि इंदूरच्या पिथमपूरमध्ये कंपनीचा प्रकल्प उभा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्याचबरोबर पतंजलीच्या उत्पादनाची थोड्या प्रमाणात निर्यातदेखील सुरू झाली आहे. नागपूरच्या मिहान क्षेत्रात एसईझेडमध्ये १०० टक्के निर्यातक्षम प्रकल्प उभा करण्याचे काम तेजीने सुरू आहे. येथून यूएई, अमेरिका, कॅनडा, युरोप, दक्षिण अमेरिका, आफ्रिकी देशांव्यतिरिक्त इतर देशांतही पतंजलीची उत्पादने निर्यात होतील.’
रामदेव यांनी सांगितले की, “पतंजली कंपनीच्या नफ्यातून लोकांना शिक्षण, आरोग्य, योग आणि आयुर्वेद, संशोधन, गोसेवा याव्यतिरिक्त गरिबांच्या कल्याणासाठी खर्च करणार आहे. आतापर्यंत आम्ही ११,००० कोटी रुपये चॅरिटीवर खर्च केले आहेत. संपूर्ण विस्ताराच्या मुळाशी एक लाख कोटी रुपयांची चॅरिटी करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
या वेळी पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी (एमडी आणि सीईओ) आचार्य बालकृष्ण यांच्याव्यतिरिक्त एटीएमचे संस्थापक विजयशेखर शर्मा, पेटीएम मॉलचे सीओओ अमित सिन्हा, बिग बास्केटचे सह-संस्थापक व सीईओ हरी मेनन, फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती, ग्रोफर्सचे संस्थापक सौरभ कुमार, अॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष मनीष तिवारी, नेटमेड्सचे संस्थापक प्रदीप दाढा, वनएमजीचे संस्थापक प्रशांत टंडन, शॉपक्लूजचे सहसंस्थापक संजय सेठी आणि एचडीएफसी बँकेच्या ई-कॉमर्स प्रमुख स्मिता भगत उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.