आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात मोठा बँकिंग घोटाळा;नीरव मोदी, मेहुल चौकसी यांच्या शोरूममधील हिरे, दागिने जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नीरव माेदी आणि त्याचे मामा मेहुल चौकसी यांच्या शोरूमवर छापे मारून प्रवर्तन निदेशालयाने ५,७३६ कोटी रुपयांचे हिरे, सोने आणि दागिने जप्त केले असले तरी यातून कर्जाची वसुली होणे अवघड आहे. जप्त करण्यात आलेल्या या हिरे-दागिन्यांचा लिलाव कायदेशीररीत्या बँकेला करता येईल, असे नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसे झाले तरी या विक्रीतून वसुलीसाठी ५ ते ७ वर्षे लागण्याची शक्यता आहे. यादरम्यान या हिरे तसेच दागिन्यांच्या सुरक्षेवर सरकारला लाखो रुपयांचा खर्च करावा लागेल. पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) नीरव आणि मेहुल यांच्यावर ११,३९४ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे.  


ईडीची ही कारवाई “प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’ (पीएमएलए)  अंतर्गत करत असल्याची माहिती वकील सुबोध कुमार पाठक यांनी दिली. हा फौजदारी गुन्हा आहे. कायद्यातील तरतुदीनुसार आरोपीने टेंटेड (चुकीच्या पद्धतीने मिळवलेल्या) पैशापासून मालमत्ता किंवा अॅसेट मिळवली आहे, तर ती जप्त करता येते. मात्र, जोपर्यंत खटल्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत त्याचा लिलाव किंवा विक्री करता येत नाही. 

 

६० दिवसांत भरणा न केल्यास होतो लिलाव  
नीरव मोदी याने जे कर्ज घेतले होतेे, त्या बदल्यात नेमके काय गहाण ठेवले होते, ते अद्याप स्पष्ट नाही. चल संपत्तीमध्ये शेअर, बुक ऑफ बॅलन्सशीट आदींचा समावेश आहे. जर मोदीने साठा माॅर्गेज केला असेल तर सरफेस कायद्यांतर्गत लिलाव करण्यास सोपे होईल. मात्र, असे झाले नसेल तर खटल्याचा निकाल लागेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. याअंतर्गत कर्जाची परतफेड करण्यासाठी सरकार नोटीस देते. त्यात ६० दिवसांची मुदत असते.

 

 ..तर फ्रँचायझी स्टोअरला माल परत करावा लागेल

हिरे-दागिन्यांशी संबंधित एका व्यापाऱ्याने सांगितले की, ईडीने ५,७३६ कोटींचा माल जप्त केला आहे. यातील काही नीरव अन् मेहुल यांच्या कंपन्यांच्या फ्रँचायझी असलेल्या स्टोअरचा असेल. फ्रँचायझी मालासाठी आधी पैसे देतात. अशा परिस्थितीत फ्रँचायझी असलेल्या स्टोअरला माल परत करावा लागण्याची शक्यता आहे.

 

गीतांजली शेअरमध्ये १०% घसरण  
गीतांजली जेम्सचे शेअर बुधवारी १०% घसरले. १२ फेब्रुवारीच्या ६२.८५ रुपयांवरुन ते ५६% घसरले आहे. पीएनबीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली. बीएसईमध्ये ५५ पैशांच्या वाढीसह पीएनबी ११७.१० रुपयांवर बंद झाला.  


बँकांच्या प्रमुखांसोबत बैठक 
पीएनबी फसवणुकीचा परिणाम झालेल्या बँकांच्या प्रमुखांसोबत अर्थ मंत्रालय बैठक करणार आहे. या बँकेच्या अधिकाऱ्यांनीही नियम पाळले नसल्याचे मंत्रालयाला वाटते. 


 जेपीसी तपासात तृणमूलचा अडथळा 
 या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी)मार्फत तपासाची काँग्रेसची मागणी आहे. मात्र, तृणमूल काँग्रेस विरोधात आहे.

बातम्या आणखी आहेत...