आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवक घटूनही डाळिंबाचे दर आठवड्यात 900 रुपयांनी उतरले; शेतकरी चिंताग्रस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबादच्या बाजारपेठेने डाळिंबाच्या दरात आठवडाभरातच तब्बल ९०० रुपयांची घसरण अनुभवली आहे. विशेष म्हणजे डाळिंबाची आवक अर्ध्यावर येऊनही दरात मोठी घट झाल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. उत्तरेतील राज्यांतून मंदावलेल्या मागणीमुळे दर पडल्याचे व्यापारी सांगतात.  शनिवारी डाळिंब १६५० रुपये क्विंटलने विकले.  


यंदा डाळिंबाच्या बाजाराने दहा वर्षांतील नीचांकी पातळी गाठली आहे. या वर्षात डाळिंबाचा बाजार सातत्याने मंदीत  आहे. महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भात डाळिंबाखालील क्षेत्र लक्षणीय प्रमाणात वाढले. या भागात तेल्या रोगाचा प्रादुर्भाव तीव्र नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील अौरंगाबाद, फुलंब्री, पैठण, पाचोड तालुके  डाळिंब लागवडीसाठी महत्त्वाचे समजले जातात. इथल्या डाळिंबाला महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, दिल्ली, चेन्नई आणि मध्य प्रदेशातही मोठी मागणी अाहे.  

देशात डाळिंबाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ६७ %  

- देशातील डाळिंबाखालील क्षेत्र आणि उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा निम्म्याहून अधिक आहे. 
- २०१५-१६ मध्ये राज्यातील क्षेत्र १२.८ लाख हेक्टर तर उत्पादन १४.८ लाख टनांपर्यंत पोहोचले. 
- आधीच्या तीन वर्षांशी तुलना करता क्षेत्रात ४२ टक्के तर उत्पादनात ५७ टक्के वाढ झाली. 
- २०१५-१६ मधील आकडेवारीनुसार देशातील डाळिंबाच्या क्षेत्रात ६६ टक्के तर उत्पादनात ६७ टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. 
- महाराष्ट्राखालोखाल कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांत डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. 

 

 

थंडीमुळे उत्तरेतून मागणी घटली 

महाराष्ट्रातील डाळिंबाला उत्तर व दक्षिण भारतात मोठी मागणी असते. मात्र, उत्तरेत थंडीचा कडाका वाढल्याने ज्यूससाठी लागणाऱ्या डाळिंबाची मागणी घटली आहे. दक्षिण भारतात वादळामुळे डाळिंबाला बाजार मिळत नाही. याचा फटका राज्यातील डाळिंब उत्पादकांना बसल्याची माहिती फळांचे होलसेल विक्रेते अब्बासभाई यांनी दिली. 

 

बातम्या आणखी आहेत...