आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकांच्या तक्रारीनंतर अॅपलची माफी; 5,900 ची बॅटरी देणार 2000 रुपयांत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आयफोनची गती मंद करण्याच्या प्रकरणात अमेरिका आणि इस्रायलमध्ये याचिका दाखल झाल्यानंतर अॅपलने ग्राहकांची माफी मागितली आहे. आयफोन - ६ आणि त्यानंतरच्या व्हर्जनच्या ग्राहकांना अॅपलने सवलतीच्या दरात नवीन बॅटरी देण्याची घोषणा केली. अॅपल इंडियाने दिलेल्या माहितीनुसार भारतात ५,९०० रुपयांची बॅटरी केवळ २००० रुपयांत दिली जाणार आहे. मात्र, त्यावरील कर ग्राहकांना वेगळा भरावा लागणार आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ही बॅटरी उपलब्ध होण्याचा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.  


अॅपलने त्यांच्या वेबसाइटवर लिहिले की, “तुम्ही विचार करत असाल की अॅपलने तुम्हाला निराश केले. आम्ही माफी मागतो. या विषयावर खूपच गैरसमज झाला आहे. आम्ही कोणत्याही अॅपल उत्पादनाचे अायुष्य मुद्दाम कमी करणार नाही. जुनी झाल्यावर बॅटरीची “पिक एनर्जी लोड’ उचलण्याची क्षमता कमी होते. यामुळे डिव्हाइस अचानक बंद होऊ शकते. डिव्हाइस असे अचानक बंद होणे, कोणत्याही ग्राहकांना नको असेल, असे आम्हाला वाटते.’  


वास्तविक मागील वर्षी फोन अचानक बंद होत असल्याच्या तक्रारीनंतर अॅपलने सॉफ्टवेअर अपडेट केले होते. मात्र, यामुळे प्रोसेसिंग मंद गतीने काम करू लागले. सॉफ्टवेअर बदलल्यामुळेच गती मंदावली असल्याचा खुलासा सॉफ्टवेअर संस्था प्राइमेअ लॅब्जने १८ डिसेंबर रोजी केला होता. अॅपलनेही ते मान्य केले होते. आता कंपनी पुन्हा सॉफ्टवेअर अपडेट करणार आहे. यामुळे ग्राहकांना बॅटरीची संपूर्ण माहिती मिळू शकेल.मागील आठवड्यात अॅपलने चूक मान्य केल्यानंतर अमेरिका व इस्रायलमध्ये कंपनीच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...