आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदूषण घोटाळ्यात ऑडीचे सीईओ रुपर्ट स्टेडलर यांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रँकफर्ट - फॉक्सव्हॅगन समूहाचा लक्झरी विभाग ऑडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रुपर्ट स्टेडलर यांना सोमवारी सकाळी त्यांच्या घरून अटक करण्यात आली. डिझेल कारमध्ये प्रदूषण घोटाळ्याशी संबंधित आकडेवारीत हेराफेरी करण्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. तपास संस्थांच्या अधिकाऱ्यांनी स्टेडलर यांच्या घराची झडतीदेखील घेतली. स्टेडलर पुरावे नष्ट करण्याची त्यांना भीती होती. कंपनीने स्टेडलर निर्दोष असल्याचे म्हटले आहे.  
फॉक्सव्हॅगनचा प्रदूषण घोटाळा २०१५ मध्ये अमेरिकेत पकडण्यात आला होता. मात्र, स्टेडलर यांना अमेरिकेच्या सांगण्यावरून अटक करण्यात आली नसल्याचे जर्मन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ५५ वर्षीय स्टेटलर यांनी १९९० मध्ये ऑडी कंपनी जॉइन केली होती. ते २००७ पासून कंपनीत सीईओ आहेत. घोटाळा समोर आल्यानंतर दुसऱ्या कार कंपन्या बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीझजच्या कार्यालयातही छापे मारण्यात आले होते.  


या प्रकरणात अटक झालेले स्टेडलर फॉक्सव्हॅगनचे सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. अॉडीच्या इंजिन विकास विभागाचे प्रमुख व्होल्फगँग हॅज यांना सप्टेंबर २०१७ मध्येच अटक करण्यात आली होती. ते अद्यापही तुरुंगातच आहेत. या वर्षी एप्रिल महिन्यात फॉक्सवॅगनची उपकंपनी पोर्शेच्या इंजिन विभागाचे प्रमुख जोएर्ग कर्नर यांनाही अटक करण्यात आली होती. ज्या वेळी हा घोटाळा पकडण्यात आला होता, त्या वेळी तेही ऑडीमध्येच होते.

 

१.१ कोटी कारमध्ये लावले प्रदूषण लपवणारे सॉफ्टवेअर   
प्रदूषण घोटाळा अमेरिकी परीक्षणात पकडण्यात आला होता. फॉक्सव्हॅगनने सप्टेंबर २०१५ मध्ये प्रदूषण कमी दाखवण्यासाठी अवैध सॉफ्टवेअरचा वापर केल्याचे मान्य केले होते. या सॉफ्टवेअरमुळे प्रशिक्षणात डिझेल गाड्या कमी प्रदूषण दाखवतात. हे सॉफ्टवेअर १.१ कोटी डिझेल कारमध्ये लावण्यात आले होते. यामध्ये ऑडीच्या व्यतिरिक्त फॉक्सव्हॅगन, पोर्शे, स्कोडा आणि सीट ब्रँडच्या कारचा समावेश होता.   

 

केवळ दोघांना शिक्षा  
आतापर्यंत दोघांना शिक्षा झाली असून ते दोघेही अमेरिकी आहेत. फॉक्सव्हॅगनचे माजी सीईओ ओलिव्हर श्मिट यांनी घोटाळ्यास सहभाग मान्य केला होता, त्यांना सात वर्षांचा तर तपासात मदत करणारे इंजिनिअर जेम्स लियांग यांना ४० महिन्याचा तुरुंगवास झाला आहे.

 

२ लाख कोटी नुकसान  
प्रदूषण घोटाळ्यामुळे फॉक्सव्हॅगनला अमेरिकेमध्ये बायबॅक, दंड आणि भरपाईच्या स्वरूपात सुमारे २ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जर्मन अधिकाऱ्यांनी याच महिन्यात युरोपात ६०,००० ऑडी कार रिकॉल करण्याचे आदेश दिले आहेत.  

 

विंटरकॉर्नच्या विरोधात अमेरिकेत तक्रार  
अमेरिकेने मागील महिन्यातच फॉक्सव्हॅगनचे माजी सीईओ मार्टिन विंटरकॉर्न यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यांना अमेरिकेत पाठवण्याची शक्यता कमीच आहे, कारण जर्मनी त्यांच्या नागरिकांचे युरोपियन युनियनच्या बाहेर प्रत्यार्पण करत नाही. मला प्रदूषण लपवणाऱ्या सॉफ्टवेअरबद्दल खूप उशिरा माहिती मिळाली होती, असे त्यांनी सांगितले आहे. 

बातम्या आणखी आहेत...