आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक विमा योजनेसाठी तज्ञांची मदत;अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यासाठी दिशानिर्देशात करणार बदल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी (पीएमएफबीवाय) पुढील महिन्यापासून सरकार तज्ज्ञांची मदत घेणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत तेजी आणण्यासाठी तसेच देशात पेरणी झालेल्या एकूण पिकांपैकी ५० टक्के भाग या योजनेअंतर्गत आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी कृषी मंत्रालयाने दिशानिर्देशात काही बदलदेखील केले आहेत. हे बदल पुढील एका आठवड्यात जारी करण्यात येतील. त्यासाठी सध्याचे पोर्टलदेखील अपग्रेड करण्यात आले आहे.  


केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी ही माहिती दिली. उद्योग संघटना फिक्कीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आतापर्यंत या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या योजनेची व्याप्ती वाढली आहे. तरीदेखील अद्याप याचा विस्तार करणे बाकी आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही शेखावत यांनी सांगितले. आतापर्यंत देशात पेरणी झालेल्या पिकांपैकी ३० टक्के पिके योजनेच्या अंतर्गत आली आहेत. 

 

किरकोळ प्रीमियमवर मिळतो विमा 
केंद्र सरकारने पीक विमा योजनेची घोषणा २०१६ मध्ये केली होती. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना किरकोळ प्रीमियमवर पीक विमा मिळतो. धान्य तसेच तेलबियांसाठी प्रीमियमचे दर १.५ टक्के ते २ टक्क्यांच्या दरम्यान आहे. कापूस आणि इतर पिकांसाठी याचे दर ५ टक्क्यांपर्यंत आहेत. २५ राज्यांमध्येही ही योजना लागू करण्यात आली आहे. मागील वर्षी २०१६-१७ (जुलै ते जून) दरम्यान ५.७० कोटी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...