आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरातील सोन्याच्या मागणीत घट तर भारतात वाढ : सुवर्ण परिषद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मागील वर्षी २०१७ मध्ये भारतातील सोन्याच्या मागणीत ९.१ टक्क्यांची वाढ झाली असून भारतात या वर्षात ७२७ टन सोन्याची मागणी नोंदवण्यात आली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याची किंमत कमी असल्याने या दिवशी भारतात सर्वाधिक खरेदी नोंदवण्यात आली आहे. 


विशेष म्हणजे वर्षभरात सर्वाधिक वाढ ग्रामीण भागात नोंदवण्यात आली असल्याची माहिती जागतिक सुवर्ण परिषदेच्या (डब्ल्यूजीसी) ताज्या अहवालात देण्यात आली आहे. परिषदेच्या “गोल्ड डिमांड ट्रेंड्स’ नावाच्या या अहवालानुसार २०१६ मध्ये भारतात ६६६.१ टन सोन्याची मागणी नोंदवण्यात आली होती. एकीकडे भारतातील मागणी वाढत असताना जागतिक पातळीवरील सोन्याच्या मागणीत सात टक्क्यांची घट नोंदवण्यात आली असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत झालेल्या वाढीमुळेच ही तेजी नोंदवण्यात आली असल्याची माहिती डब्ल्यूजीसीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सोमासुंदरम पीआर यांनी दिली. भारतात गेल्या वर्षी सोने दागिन्यांच्या मागणीत १२ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली होती आणि ही ५६२.७ टनावर पोहोचली होती. तर २०१६ मध्ये ही मागणी ५०४.५ टन होती. किमतीच्या हिशेबाने २०१७ मध्ये ही मागणी ९ टक्क्यांच्या वाढीसह १.४८ लाख कोटी रुपये झाली जी, २०१६ मध्ये १.३६ लाख कोटी रुपये होती. वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी स्थिरावली असून मागील वर्षी शेअर बाजारातही चांगली सुधारणा झाली आहे. त्याचबरोबर जीडीपी विकास दराची सकारात्मक आकडेवारी आणि विशेष करून ग्रामीण भागातील ग्राहकी निर्देशांकात झालेल्या वाढीमुळे सोन्याची खरेदी वाढली असल्याचेही मत या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...