आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती जुमा यांच्या राजीनाम्यानंतर दक्षिण आफ्रिकेमधील गुप्ता बंधूंच्या ‘साम्राज्या’ला धोका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग- दक्षिण आफ्रिकेतील उद्योजक आणि अव्वल १० मध्ये समावेश असलेले अब्जाधीश भारतवंशीय गुप्ता परिवाराचे “बुरे दिन’ सुरू झाले आहेत. राष्ट्रपती जॅकब जुमा यांनी राजीनामा दिल्याने हा परिणाम झाला आहे. जुमा यांचे राजकीय भविष्य बुडवण्यामध्ये अजय, अतुल आणि राजेश गुप्ता यांचा सर्वात मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे.

 

आठवडाभरापूर्वीच जुमा यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित घोटाळ्यामध्ये गुप्ता बंधूंचा समावेश अाहे. जुमा यांनी राजीनामा देण्याआधीच गुप्ता बंधूंच्या ठिकाणांवर पोलिस आणि भ्रष्टाचारविरोधी संस्थांनी छापे टाकले होतेे. गुप्ता यांच्या उद्योगाशी संबंधित प्रमुख लोकांना अटकदेखील करण्यात आली आहे. त्यांच्यातील सर्वात मोठा भाऊ अजय गुप्ता फरार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील मूळ असलेल्या गुप्ता बंधूंनी अत्यंत कमी काळात दक्षिण आफ्रिकेत मोठा उद्योग उभा केला होता. कॉम्प्युटर, खाण, मीडिया, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीसारख्या क्षेत्रात त्यांनी प्रगती साधली होती. अतुल गुप्ता यांच्या नेतृत्वात हे कुटुंब १९९३ मध्ये आफ्रिकेत आले होते. त्यांनी २०१० मध्ये ‘द न्यूज एज’ वृत्तपत्राला सुरुवात केली होती, ते जुमा यांचे समर्थक मानले जायचे. २०१३ मध्ये त्यांनी वृत्त वाहिनी सुरू केली होती. राजकीय मंडळींमध्ये गुप्ता परिवाराची ऊठबस वाढली आणि जुमा राष्ट्रपती बनण्याआधीच गुप्ता आणि आफ्रिकन नॅशनल काँग्रेसशी घनिष्ठ संबंध निर्माण झाले.  गुप्ता ब्रदर्सचे सहारा कॉम्प्युटरमध्ये जुमा यांचा मुलगा दुदुजेन संचालक होता. जुमा यांची तिसरी पत्नी बोंगी व मुलगी गुप्तांच्या कंपनीत होते. त्यांच्यावर चौकशी लागण्याची शक्यता असून ते देश सोडून पळून जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील एप्रिल महिन्यात ते मोठ्या सुटकेससह खासगी विमानाने देशाबाहेर गेले होते, त्याच वेळी ते परत येणार नसल्याची चर्चा होती. 

 

जोहान्सबर्गच्या रस्त्यावर ‘गुप्ता मस्ट फॉल’चे नारे 

गुप्ता कुटुंबीयांचे नाव मार्च २०१५ पासून वादाशी जाेडले गेले आहे. त्या वेळी गुप्ता ब्रदर्स यांनी ३२० कोटी रुपयांची लाच देण्याची ऑफर दिली असल्याचा आरोप माजी उप-अर्थमंत्री मेबिसी जोनस यांनी केला होता. जोनस यांना अर्थमंत्री पदाचे आमिष दाखवले होते. ताजा वाद एका डेअरी प्रकल्पाशी संबंधित आहे. हा प्रकल्प गरिबांसाठी होता. मात्र, मोठ्या प्रमाणात घोटाळा करून ११० कोटी रुपयांची हेराफेरी करण्यात आली आहे. जुमा पदावर असल्याने या सर्व प्रकरणात प्रवर्तन निदेशालयाने गुप्ता ब्रदर्सवर कारवाई केली नाही. तपास सुरू असल्याचा दिखावा करण्यात आला. गुप्ता परिवाराबद्दल लोकांच्या मनात खूप राग असल्याने रस्त्यावर ‘गुप्ता मस्ट फॉल’चे नारे सुरू आहेत. 

बातम्या आणखी आहेत...