आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारचाकी गाड्या महागल्‍या; मारुती व होंडा कंपनीने वाहन दारात केली 32 हजारांपर्यंत वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतातील सर्वात मोठी ऑटोमोबाइल कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड आणि होंडा कार्स इंडिया लिमिटेडने आपापल्या गाड्यांच्या दरात ३२ हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे दोन्ही कंपन्यांनी हा दरवाढीचा निर्णय घेतला आहे. मारुती सुझुकीने त्यांच्या विविध प्रकारच्या मॉडेलच्या किमती १,७०० रुपयांपासून ते १७,००० रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. या नव्या किमती बुधवारपासून लागू होतील. ज्या मॉडेल्सच्या दरात वाढ करण्यात आली आहे, त्यामध्ये अल्टोपासून कॉम्पॅक्ट एसयूव्ही विटारा ब्रेझा आणि प्रीमियम क्रॉसओव्हर एस-क्रॉस यांचाही समावेश आहे. मारुतीने ही दर वाढ कमोडिटी, व्यवस्थापन आणि वितरण खर्चात झालेल्या वाढीमुळे केली आहे. तर होंडा कार्सने आपल्या विविध मॉडेलच्या किमतीत सहा हजार ते ३२ हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. ही वाढ आठ जानेवारीपासून देशभरात लागू झाली आहे. असे असले तरी अकॉर्ड मॉडेलवर या दरवाढीचा परिणाम झालेला नाही.  


टाटा मोटर्सने याआधीच एक जानेवारीपासून त्यांच्या विविध मॉडेलच्या दरात २५,००० रुपयांपर्यंतची वाढ केली आहे. फोर्ड इंडियानेदेखील विविध मॉडेलच्या दरात चार टक्क्यांपर्यंत वाढ केली असल्याचे सांगितले आहे. 


त्याव्यतिरिक्त इतर कंपन्यांनीही म्हणजेच ह्युंदाई मोटार इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, स्कोडा, इसुझू आणि रेनॉसह इतर वाहन निर्मात्या कंपन्यांनी याच महिन्यात दरवाढ करणार असल्याचे सांगितले आहे. या कंपन्या लवकरच तशी घोषणा करतील.

बातम्या आणखी आहेत...