आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचपीसीएलचे 51.11% शेअर ओएनजीसीने केले खरेदी; 77.88 कोटी शेअरसाठी प्रतिशेअर ‌‌ 473.97 मूल्य निश्चित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ओएनजीसी देशातील दुसरी सर्वात मोठी तेल मार्केटिंग कंपनी एचपीसीएलमध्ये सरकारची ५१.११ टक्के भागीदारी ३६,९१५ कोटी रुपयांत खरेदी करणार आहे. कंपनीतील ७७.८८ कोटी शेअरसाठी प्रतिशेअर ४७३.९७ रुपये सरकारला ओएनजीसी देणार आहे. ही किंमत मुंबई शेअर बाजारातील एचपीसीएलचे शुक्रवारी बंद भाव ४१६.५५ रुपयांपेक्षा सुमारे १४ टक्के जास्त आहे. या शेअरच्या ६० दिवसांच्या सरासरीपेक्षाही १० टक्के जास्त आहे. हा व्यवहार नगदीमध्ये होणार असून चालू महिन्याच्या अखेरपर्यंतच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.  


अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणेनुसार ओएनजीसीने हिंदुस्तान पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) मध्ये सरकारची भागीदारी खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने मागील वर्षी १९ जुलै रोजीच या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता दिली होती. त्याचबरोबर किंमत निश्चित करण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली एक “अाल्टरनेटिव्ह मेकॅनिझम’ बनवली होती. त्यानुसार शनिवारी या व्यवहारातील नियम आणि अटींना मंजुरी देण्यात आली.  ओएनजीसीच्या संचालक मंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत अधिग्रहण प्रस्तावाला मंजुरी दिली होती.  


ओएनजीसी कच्चे तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. भारतीय उत्पादनात कंपनीची सुमारे ७० टक्के भागीदारी असते, तर एचपीसीएल कच्च्या तेलापासून पेट्रोल आणि डिझेल तयार करते. 

 

पहिल्यांदाच निर्गुंतवणुकीकरणाच्या उद्दिष्टापेक्षाही जास्त जमा  

 

ओएनजीसी-एचपीसीएल करारामुळे सरकारला पहिल्यांदाच चालू आर्थिक वर्षातील निर्गुंतवणुकीकरणाच्या वार्षिक उद्दिष्टापेक्षाही जास्त रक्कम जमा करण्यात मदत मिळणार आहे. चालू आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये सरकारने निर्गुंतवणुकीतून ७२,५०० कोटी रुपये मिळवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. ११ जानेवारी २०१८ पर्यंत सरकारने या माध्यमातून ५४,३३७.६० कोटी रुपये मिळवले आहेत. ओएनजीसी-एचपीसीएल करारामुळे निर्गुंतवणुकीकरणातून मिळणारी रक्कम वाढून ९१,२५२.६० कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. निर्गुंतवणुकीकरणाच्या उद्दिष्टापेक्षाही ही रक्कम २६ टक्के जास्त आहे. यामुळे सरकारला  आर्थिक तूट भरून काढण्यास मदत मिळेल. 

 

एचपीसीएलवर एक नजर 

- २,१३,४८९ कोटी रुपयांचा टर्नओव्हर 
- ६,५०२ कोटी रुपयांचा नफा २०१६-१७ मध्ये 
- १४,६७५ पेट्रोल पंप आहेत देशभरात 
- २१ % भागीदारी आहे बाजारातील 
- ३.५२ कोटी टन पेट्रोलियम उत्पादनाची विक्री करते 
- ३८३ वी क्रमवारी फॉर्च्युन जागतिक - ५०० कंपन्यांच्या यादीत 
- ४८ वी क्रमवारी टॉप-२५० जागतिक ऊर्जा कंपन्यांमध्ये
बातम्या आणखी आहेत...