आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपलविरोधात 2 देशांत याचिका; आयफोन ग्राहकांची तक्रार- कंपनीने तांत्रिक चूक लपवली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रान्सिस्को- अॅपलसाठी आयफोनची बॅटरी खराब निघणे खूपच महागात पडण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इस्रायलमध्ये कंपनीच्या विरोधात “क्लास अॅक्शन’ खटले दाखल करण्यात आले आहेत. ज्या प्रकरणात परिणाम झालेल्या लोकांची संख्या खूपच जास्त असते अशा प्रकरणाला “क्लास अॅक्शन’ असे म्हटले जाते. न्यायालयाने अॅपलच्या विरोधात निर्णय दिला तर अॅपलला मोठा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क आणि इलिनॉयसच्या जिल्हा न्यायालयात आठ खटले दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी इस्रायलमध्येेदेखील दोन लोकांनी याच प्रकरणात अॅपलवर खटले दाखल केले होते. त्यांनी ८०० कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे.  


मागील आठवड्यातच अॅपलने नवीन सॉफ्टवेअरमध्ये प्रोसेसिंग गती मंद करण्यात आली होती, असे मान्य केले होते. सॉफ्टवेअर अपडेट केल्याने फोन मंद गतीने चालेल, अशी कल्पना कंपनीने ग्राहकांना आधीच द्यायला हवी होती, असे या ग्राहकांच्या याचिकेत म्हटले आहे. मात्र, आधी कल्पना नसल्याने केवळ बॅटरी बदलण्याची आवश्यकता असतानाही नवीन फोनची खरेदी केली. सॅन फ्रान्सिस्को न्यायालयात आयफोन ग्राहकांच्या वतीने जेफरी फाजियो नावाच्या वकिलाने याचिका दाखल केली आहे. जेफरी यांनी २०१३ मध्येदेखील अॅपलच्या विरोधात एक प्रकरणात विजय मिळवला होता. ते प्रकरण आय फोनच्या वॉरंटीशी संबंधित होते. त्या वेळी अॅपलला सुमारे ३५० कोटी रुपये द्यावे लागले होते.

 

> सॉफ्टवेअर संस्थेच्या खुलाशानंतर अॅपलने केले मान्य  

 

अॅपलने प्रोसेसिंग गती कमी केल्याचे केले मान्य
गेल्या आठवड्यात अॅपलने मान्य केले होते की, २०१६ मध्ये आयफोन ६, आयफोन ६ एस, आयफोन एसई आणि आयफोन ७ च्या ऑपरेटिंग प्रणालीमध्ये जे अपडेट जारी करण्यात आले होते, ते विशिष्ट प्रकारचे फीचर होते. हे फीचर जुन्या आणि कमी चार्ज असलेल्या बॅटरीमधून पॉवरचा पुरवठा मंद करते. या फीचरशिवाय फोन अचानक बंद होतो.


१८ डिसेंबर रोजी सॉफ्टवेअर संस्थेने केला खुलासा  
सॉफ्टवेअर संस्था प्राइमेट लॅब्जने १८ डिसेंबर रोजी पहिल्यांदा या प्रकरणाचा खुलासा केला होता. ही कंपनी अायफोनचा परफॉर्मन्स मोजण्याचे अॅप बनवते. सॉफ्टवेअरमध्ये बदल केल्याने आयफोनची गती कमी झाली असल्याची शक्यता या कंपनीने व्यक्त केली होती. बॅटरी चार्ज असली तरी त्यांचा फोन अचानक स्वत:हून बंद होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या.

 

सांगितले असते तर बॅटरी बदलली असती  
बॅटरीमुळे केवळ फोनची गतीच कमी झाली असे नाही, तर अनेक अॅपदेखील बंद पडले. फोनचे प्रोसेसर जुने झाल्यामुळे असे झाले असल्याचे ग्राहकांना वाटल्यामुळे त्यांनी नवीन फोनची खरेदी केली. कंपनीने बॅटरीमुळे असे होत असल्याचे सांगितले असते तर अत्यंत कमी पैशात केवळ बॅटरी बदलली असती, असे मत ग्राहकांनी व्यक्त केले.  


अॅपलने दुसरी बॅटरी मोफत द्यायला हवी   
या फोनमधील बॅटरी प्रोसेसरच्या गतीला मदत करण्यास सक्षम नव्हती, असे ग्राहकांच्या याचिकेत म्हटले आहे. ही एक प्रकारची तांत्रिक कमतरता आहे. कंपनीने या बॅटरीऐवजी ग्राहकांना मोफत दुसरी बॅटरी द्यायला हवी होती. असे करण्याऐवजी कंपनीने बॅटरीमधील कमतरता लपवण्याचा प्रयत्न केला. 

 

चायनीज कंपनीचा अॅपलवर ट्रेडमार्क चोरण्याचा आरोप

चीनमधील कपडा कंपनीने अॅपलवर कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याची तक्रार दाखल केली आहे. अॅपलने जूनमध्ये अॅप स्टोअरसाठी जो लोगो वापरला तो, ‘कोन’ नावाच्या कंपनीच्या लोगोशी जुळत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या कंपनीने अॅपलकडे १० लाख रुपयांची भरपाई मागितली आहे.  या याचिकेनुसार ‘कोन’ ही कपड्याची कंपनी हा ट्रेडमार्क २०११ पासून वापर करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...