रिझर्व्ह बँक, सेबीच्या मंडळासोबत अर्थ मंत्री अरुण जेटली यांची बैठक
नवी दिल्ली- पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच २०१८-१९ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेची सर्वात मजबूत स्थिती राहणार असल्याचे मत अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले आहे. आर्थिक तुटीच्या प्रश्नांसंदर्भात चिंताजनक स्थितीत नसल्याचेही त्यांनी सांगितले. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अर्थमंत्री रिझर्व्ह बँकेच्या तसेच सेबीच्या सदस्यांशी चर्चा करतात, त्या चर्चेत त्यांनी ही माहिती दिली आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याची चिंता काल्पनिक असून त्याला ठोस आधार नसल्याचेही त्यांनी सांगितले. मागील तीन दिवसांत कच्च्या तेलाचा ट्रेंड बदलला असल्याचेही ते म्हणाले. पतधोरण आढावा समितीच्या वतीने व्याजदरात कोणताच बदल न करण्याचा निर्णय संतुलित होता असेही मत त्यांनी मांडले आहे. सात फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत व्याजदरात बदल न करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीने घेतला होता.