आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेपो दरामुळे बाजारातील घसरण कायम; सेन्सेक्स 113 तर निफ्टी 22 अंकांनी घसरला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने सलग तिसऱ्या पतधोरण आढावा बैठकीमध्ये व्याजदरात कोणताच बदल करण्यात आलेला नाही. पतधोरण आढावा जाहीर झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात घसरण नोंदवण्यात आली. बँक, आयटी आणि आर्थिक सेवा क्षेत्रातील शेअरमध्ये झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी सलग चौथ्या दिवशी घसरणीसह बंद झाले. यातील सेन्सेक्स ११३ अंकांच्या घसरणीसह ३४,०८२ या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी २२ अंकांच्या घसरणीसह १०,४७७ या पातळीवर बंद झाला.  


याआधी जागतिक बाजारात झालेल्या सुधारणेमुळे बुधवारी सुरुवातीला भारतीय शेअर बाजारातदेखील सुधारणा दिसून आली होती. बुधवारी झालेल्या व्यवहारात सेन्सेक्स ३६७ अंकांच्या वाढीसह ३४,५६३ या पातळीवर उघडला, तर निफ्टी १०९ अंकांच्या वाढीसह १०,६०७ अंकांवर उघडला होता. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर व्यवहाराच्या तीन दिवसांत (२, ५ आणि ६ फेब्रुवारी) शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. गुंतवणूकदारांचे या तीन दिवसांत आठ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.  लार्जकॅप शेअरच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमध्ये चांगली खरेदी नोंदवण्यात अाली. मुंबई शेअर बाजारातील मिडकॅप निर्देशांक ०.४३ % वाढीसह १६३५१ या पातळीवर बंद झाला. 


४९ शेअरचा नवा उच्चांक 

बाजारात चढ-उतार सुरू असला तरी मुंबई शेअर बाजारातील ४९ शेअरमध्ये ५२ आठवड्यांतील नवा उच्चांक गाठला आहे. यामध्ये भारत फायनान्शियल इन्क्लुजन, एस्टर, एक्स्कॉर्ट््स, जुबिलएंट लाइफ सायन्स यांचा समावेश आहे.  

 

अमेरिकी बाजारात तेजी  

अमेरिकी शेअर बाजारात सुरू असलेल्या चढ-उतारादरम्यान मंगळवारी बाजार तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाले. डाऊ जोन्समध्ये १,१६७ अंकांचा चढ-उतार दिसून आला. व्यवहाराच्या शेवटी डाऊ जोन्स ५६७ अंकांच्या वाढीसह २४,९१३ या पातळीवर बंद झाला. नॅसडॅक १४८ अंकांच्या वाढीसह ७,११६ या पातळीवर तर एसअँडपी ५०० निर्देशांक ४६ अंकांच्या वाढीसह २,६९५ या पातळीवर बंद झाला.

बातम्या आणखी आहेत...