आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवलती रद्द केल्यानंतर कंपनी कर 25 टक्के करणार- जेटली; चार वर्षांत व्यावसायिक कर 25%

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- उद्योग क्षेत्राला मिळत असलेल्या सवलती रद्द केल्यानंतरच कंपनी कर २५ टक्क्यांपर्यंत कमी करणे शक्य असल्याचे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले आहे. अचानक सवलती देखील रद्द करणे योग्य होणार नाही, कारण अनेकांनी या आधारावरच कंपनीची सुरुवात केली असेल. त्यामुळे सध्या तरी व्यावसायिक कर २५ टक्के करणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. सवलती पूर्णपणे बंद झाल्यानंतरच ते शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले. 


उद्योग संघटना फिक्कीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विशेष म्हणजे अर्थमंत्र्यांनी २०१५-१६ चा अर्थसंकल्प सादर करताना चार वर्षात व्यावसायिक कर ३० टक्क्यांवरून कमी करून २५ टक्के करणार असल्याचे अाश्वासन दिले होते. मात्र, २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात त्यांनी वार्षिक २५० कोटींपर्यंत टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांच्याच करात ही कपात केली आहे.  


राजकोशीय तुटीच्या प्रश्नावर त्यांनी चालू आर्थिक वर्षात जीएसटीमुळे कर संकलनात घट झाली असल्याचे कारण दिले आहे. जीएसटी व्यवस्थेमध्ये व्यापारी विक्री झाल्यानंतर पुढील महिन्यात कर जमा करतात, त्यामुळे ही वाढ झाली असल्याचे ते म्हणाले. याआधी लागत असलेल्या उत्पादन शुल्कात वस्तू कंपनीतून बाहेर निघतानाच त्यावर कर लागत होता. त्यामुळे २०१७-१८ मध्ये जीएसटी संकलन एक महिने कमी होणार आहे. मार्च महिन्याचा कर एप्रिल महिन्यात जमा होईल. मात्र, खर्चाच्या बाबतीत मार्च महिन्यातील खर्चाचाही समावेश असेल. सरकारने चालू आर्थिक वर्षात ३.२ टक्के आर्थिक तुटीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. मात्र, ही ३.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे.

 

शेअर बाजारात घसरणीचे कारण दुसरेच 
भारतीय शेअर बाजारातील घसरण लाँग टर्म कॅपिटल गेनवरील करामुळे नाही तर जागतिक पातळीवरील घसरणीमुळे आली असल्याचे जेटली यांनी सांगितले. अमेरिकेच्या डाऊ जोन्समध्ये २ टक्क्यांची घसरण झाली आहे. अर्थसंकल्पात शेअरमधील गुंतवणुकीतून जास्त कालावधीत झालेल्या उत्पन्नावर १० टक्के कर लावण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी सादर झाला होता. तेव्हापासून सोमवारपर्यंत सेन्सेक्समध्ये १,२०८ अंकांची घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये तीन दिवसांत पाच लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...