आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- भारतीय निर्यातीमध्ये डिसेंबर २०१७ मध्ये १२.३६ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील महिन्यात २७.०३ अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. यात इंजिनिअरिंग वस्तू आणि पेट्रोलियम उत्पादनाचे महत्त्वाचे योगदान आहे. आयातीमध्ये ही २१.१२ टक्क्यांची वाढ झाली असून हा आकडा ४१.९१ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. यात कच्च्या तेलाच्या दरातील तेजी आणि सोने आयात वाढल्याचे मुख्य योगदान राहिले.
वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने सोमवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर महिन्यात व्यापारातील तूट १४.८८ अब्ज डॉलरवर पोहोचली. आयात आणि निर्यात यामधील अंतराला व्यापार तूट असे म्हणतात. वर्षभरापूर्वी डिसेंबर महिन्याच्या तुलनेत यात ४१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
ऑगस्ट २०१६ पासून ते डिसेंबर २०१७ दरम्यान निर्यात एका महिन्याचा अपवाद वगळता प्रत्येक महिन्यात वाढली असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. केवळ ऑक्टोबर २०१७ मध्ये निर्यातीत १.१ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली होती. डिसेंबरमध्ये इंजिनिअरिंग वस्तू आणि पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात २५ टक्क्यांपेक्षाही जास्त वाढली आहे. असे असले तरी यादरम्यान शिवलेल्या कपड्यांच्या निर्यातीत आठ टक्क्यांची घट झाली असून निर्यात १.३३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
मागणी वाढल्याने सोने आयातीत ७१.५ टक्के वाढ
डिसेंबर महिन्यात सोने आयात ७१.५ टक्क्यांच्या तेजीसह ३.३९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. डिसेंबर २०१६ मध्ये हा अाकडा १.९७ अब्ज डाॅलर होता. भारतीय बाजारातील मागणी वाढणे आणि जागतिक किमती कमी झाल्याने हा बदल झाला आहे. यादरम्यान सोन्याची जागतिक किंमत १,२५० ते १,२६ डॉलर प्रति आैस राहिली. चांदीची आयात १०६ टक्क्यांनी वाढून १९७.२६ अब्ज डॉलरवर पोहोचली. डिसेंबर २०१६ मध्ये चांदी ९५.८४ अब्ज डॉलर होती.
सोने आयात शुल्क कमी करण्याची मागणी
येत्या अर्थसंकल्पात सोने आयात शुल्क कमी करण्यावर अर्थ मंत्रालयाचा जोर आहे. सोने ज्वेलरी उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. “जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काैन्सिल’ (जीजेईपीसी) ने सोन्यावरील आयात शुल्क सध्याच्या १० वरून ४ टक्के करण्याची मागणी केली आहे.
कच्च्या तेलाची आयात ३५ टक्क्यांनी वाढली
डिसेंबर २०१७ मध्ये पेट्रोलियम उत्पादने व कच्च्या तेलाची आयात ३५ % वाढून १०.३४ अब्ज डॉलरवर पोहोचली. वर्षभरापूर्वीच्या समान कालावधीत ही ७.६६ अब्ज डॉलरवर होती. डिसेंबर महिन्यात कच्च्या तेलाचे दर वार्षिक आधारावर १८.७५ % वाढण्याचा अंदाज मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.