आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअरबरोबरच निश्चित परतावा साधनांमध्येही गुंतवणूक आवश्यक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुंतवणुकीच्या दृष्टीने शेअर सर्वाधिक मजेदार अॅसेट क्लासमधील एक आहे. मात्र, हा नेहमी अस्थिर राहत असल्याने त्यावर कायम टीका होते. अल्पमुदतीमध्ये यात नेहमीच धोका असतो. मग तुम्ही शेअरमध्ये गुंतवणूक करू नये काय ? अजिबात नाही. 

 
दोन वेगळ्या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवणूक : शेअरमध्ये अस्थिरता असली तरी त्याचे व्यवस्थापन करण्याची पद्धतही आहे. पहिली, यात सरळ गुंतवणूक करण्याऐवजी इक्विटीशी जोडलेल्या उत्पादनाच्या माध्यमातून गुंतवणूक करा. उदा. म्युच्युअल फंड. नियोजनबद्ध गुंतवणूक, नियमित आणि दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक असावी. दुसरी, इक्विटी आणि इतर अॅसेट क्लासमध्ये गुंतवणुकीची विभागणी करा. इतर अॅसेट क्लासचा शेअरशी अजिबात संबंध नको. दोन अॅसेट क्लासमध्ये असलेल्या कमीत कमी संबंधांमुळेच विशिष्ट परिस्थितीमध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळवून देऊ शकतो. एखाद्या विशिष्ट घटनेचा एका प्रकारावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, तर दुसऱ्या प्रकारावर सकारात्मक परिणाम होऊन तो स्थिर राहील. इक्विटी आणि निश्चित उत्पन्न याचे चांगले उदाहरण आहे. 


एकमेकांतील कमतरतेची भरपाई करतात : शेअरमध्ये चढ-उतार सुरूच असतात. त्यामुळे अल्प मुदतीत शेअरचा अंदाज व्यक्त करणे शक्य नसते. मात्र, दीर्घ मुदतीमध्ये इतर माध्यमांपेक्षा यात जास्त परतावा मिळतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पोर्टफोलिओमध्ये याला महत्त्वपूर्ण स्थान द्यायला हवे. निश्चित उत्पन्न देणारे इन्स्ट्रूमेंट अल्प ते मध्यम काळात चांगला परतावा देतात. वास्तविक व्याजदर आणि महागाई दरामुळे यात थोडा चढ-उतार होऊ शकतो. बाजारात घसरण झाल्यास  यामुळे तुमच्या पोर्टफोलिओच्या मूल्यात जास्त घसरण होण्यापासून बचाव होतो. शेअर आणि निश्चित उत्पन्न देणारी गुंतवणूक वेगवेगळ्या क्षेत्रात असल्यास चांगले. एकत्रितरीत्या ते एकमेकांमधील कमतरतेची भरपाई करतात.  


ही बाब काही उदाहरणांसह समजून घेऊ  
- अलीकडच्या काही वर्षांत शेअर बाजारातील सर्वात खराब वेळ जानेवारी २००८ ते मार्च २००९ पर्यंतची होती. या दरम्यान सेन्सेक्समध्ये ६०.९ टक्क्यांची घसरण झाली. मात्र, या कालावधीत निश्चित उत्पन्न देणाऱ्या पर्यायांनी (क्रिसिल कंपोझिट बाँड फंड इंडेक्स) ७.८% परतावा दिला.  
- ५ नाेव्हेंबर २०१० पासून २० डिसेंबर २०११ दरम्यान सेन्सेक्समध्ये २७.८% घसरण झाली. या दरम्यान क्रिसिल कंपोझिट बाँड फंड निर्देशांकात ७.७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.  
- २९ जानेवारी २०१५ पासून ११ फेब्रुवारी २०१६ च्या दरम्यान सेन्सेक्स २२.७ टक्क्यांनी घसरला, तर या दरम्यान क्रिसिल कंपोझिट इंडेक्सने ७.३% परतावा दिला.


गुंतवणुकीतील धोक्याच्या क्षमतेने ठरेल गुंतवणुकीची सरासरी

या उदाहरणावरून गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये शेअर आणि निश्चित उत्पन्नाच्या महत्त्वाची माहिती मिळते. त्यामुळे जास्त परतावा मिळण्यासाठी दोन्हीपैकी कोणत्या प्रकारात किती पैसे ठेवावे, हा प्रश्न उपस्थित होतो. ही बाब गुंतवणूकदाराच्या धोका पत्करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. गुंतवणूकदार आर्थिक सल्लागाराच्या मदतीने हायब्रीड म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवणूक करू शकतात. हायब्रीड फंडाचा पैसा शेअर आणि निश्चित उत्पन्न देणाऱ्या योजना, दोन्हीमध्ये गुंतवला जातो.


- हे लेखकाचे खासगी मत आहे. या आधारावर गुंतवणुकीतून नुकसान झाल्यास ‘दिव्य मराठी’ जबाबदार राहणार नाही.

 

ताहेर बादशाह

सीआयओ- इक्विटीज

इन्व्हेस्को म्युच्युअल फंड      

 

बातम्या आणखी आहेत...