आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीच्या महिलांना स्वत:चा उद्योग सुरू करता येणार; पती, पुरुष नातेवाइकाच्या परवानगीची गरज नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रियाध- सौदी अरेबियातील महिला आता पती किंवा पुरुष नातेवाइकाच्या संमतीशिवाय स्वत:चा उद्योग सुरू करू शकतील. सौदी अरेबियाच्या सरकारने गुरुवारी हा धोरणात्मक बदल जाहीर केला. याआधी अनेक दशकांपासून महिलांच्या पालकत्वाबाबत कडक यंत्रणा होती. 


सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था दीर्घकाळापासून तेलाच्या उत्पादनावर अवलंबून आहे. आता सरकार देशातील खासगी क्षेत्राचा विस्तार करत आहे. त्यात महिलांच्या रोजगारात विस्तार करण्याचा समावेश आहे. वाणिज्य आणि गुंतवणूक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, महिला आता स्वत:चा उद्योग सुरू करू शकतील तसेच सरकारच्या ई-सेवांचा लाभही घेऊ शकतील. त्यासाठी पुरुष पालकाच्या संमतीची गरज नाही. सौदी अरेबियातील सध्याच्या पालकत्व यंत्रणेनुसार, सरकारशी कुठलाही पत्रव्यवहार करण्यासाठी, प्रवास करण्यासाठी किंवा इतर कामांसाठी पती, वडील किंवा भाऊ या पुरुष पालकांची परवानगी असल्याचा पुरावा सादर करणे महिलांवर बंधनकारक आहे.  
सौदी अरेबियात महिलांवर अनेक कडक बंधने आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता प्रथमच महिला पोलिसांची भरती करण्यात येईल, या आठवड्यातच जाहीर झाले होते. सौदीतील राजवटीने विमानतळ आणि सीमेवर तपासणी करण्यासाठी १४० जागांसाठी भरती मोहीम जाहीर केली आहे. या पदांसाठी तब्बल १ लाख ७ हजार महिलांनी अर्ज केले आहेत.  

बातम्या आणखी आहेत...