आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखापरीक्षणाविना फोर्टिसचे निकाल, पैसे काढण्याची होणार स्वतंत्र चौकशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- फोर्टिस हेल्थकेअरने गुरुवारी सप्टेंबर आणि डिसेंबर तिमाहीतील आकडेवारी जाहीर केली. मात्र, ऑडिटर डेलॉय हँक्सिंसच्या लेखापरीक्षणाविना. कंपनीच्या संचालकांनी कंपनीच्या खात्यातून काढलेल्या ४७३ कोटी रुपयांचा तपास सुरू असल्याचे डेलॉयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या रकमेचा  कंपनीच्या निकालावर, नगदीवर किंवा व्यवस्थापनावर परिणाम होण्याचा  अंदाज अद्याप व्यक्त करणे शक्य नाही. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू शकत नसल्याचेही डेलाॅयने म्हटले आहे. कंपनीने काही व्हेंडरांना ५७.७६ कोटी रुपयांचे कर्ज दिले असून, त्यासाठी सुरक्षा ठेव घेतलेली नाही. यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या दरम्यान, फोर्टिसने संचालकांनी काढलेल्या पैशाची स्वतंत्र चौकशी करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी एका कायदेशीर संस्थेला काम देण्यात येणार आहे.   


कंपनीची उपकंपनी फोर्टिस हॉस्पिटलने एक जुलै २०१७ रोजी तीन कंपन्यांना ४७२.४३ कोटी रुपये दिले असल्याचे फोर्टिसने म्हटले आहे. यासाठी संचालक मंडळाची परवानगी घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा पैसा ९० दिवसांच्या दरम्यान देण्यात आला आहे. ही रक्कम २९ सप्टेंबर रोजी परत केली जाणार होती, ती परत आली नाही. १५ डिसेंबर रोजी या तीनही कंपन्या कंपनीचाच एक भाग झाल्या. अशा पद्धतीने रिलेटेड पार्टी (एकच संचालक) ट्रान्झॅक्शन झाले. आतापर्यंत फोर्टिस हाॅस्पिटलला एका कंपनीने ७० कोटी रुपये परत केले.

 

कागदपत्रे देण्यासाठी सेबीला मागितला वेळ

कंपनी नोंदणी कार्यालय एसएफआयओ आणि सेबीने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. सेबीने कंपनीकडे या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची मागणी केली होती. यातील काही कागदपत्रे जमा केली असून आणखी काही कागदपत्रांसाठी कंपनीने वेळ मागितला आहे. कंपनी प्रकरणाच्या मंत्रालयाने “सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस’ (एसएफआयओ) ला तीन महिन्यांत अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. पैसे कोणाकोणाला देण्यात आले, याचा तपास एसएफआयओ करणार आहे. 

 

डिसेंबर तिमाहीत १९ कोटींचा तोटा
फोर्टिस हेल्थकेअरने ऑक्टोबर-डिसंेबर २०१७ मध्ये १९.१० कोटी रुपयांचा तोटा झाला असल्याची माहिती दिली आहे. वर्षभरापूर्वी याच कंपनीला ४५३.२९ कोटी रुपयांचा नफा झाला होता. सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीला २३.६१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. डिसेंबर तिमाहीचा निकाल जाहीर करण्यासाठी कंपनीने १५ दिवसांचा अतिरिक्त वेळ मागितला होता. हा वेळही बुधवारी, २८ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाला. कंपनीने बुधवारी रात्री ११ वाजता दोन्ही तिमाहीतील निकाल जारी केले. 

 

संपत्ती जप्तीचा उच्च न्यायालयाचा आदेश
मागील महिन्यात हे प्रकरण समोर आल्यानंतर दोन्ही भावांनी कंपनीच्या संचालक मंडळातून राजीनामा दिला होता. मलविंदर आणि शिवइंदर यांच्यावर समूहाची आर्थिक सेवा देणारी कपंनी रेलिगेअर इंटरप्राइजेसमधूनही पैसे काढण्याचा आरोप आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने रॅनबॅक्सी कराराच्या प्रकरणात जपानच्या दाइची सँक्योला ३,५०० कोटी रुपये देण्याच्या प्रकरणात दोन्ही भावांची तारण नसलेली संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...