आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका याच आठवड्यात लावणार स्टीलवर 25 टक्के तर अॅल्युमिनियमवर 10% आयात शुल्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन/नवी दिल्ली- अमेरिका याच आठवड्यात स्टील आणि अॅल्युमिनियमवर आयात शुल्क लावण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील गुरुवारीच स्टीलवर २५ टक्के तर अॅल्युमिनियमवर १० टक्के आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव दिला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर यावरील आयात शुल्क रद्द करण्यात आले हाेते. मात्र, याचा सर्वाधिक लाभ चीन आणि जर्मनीसारख्या देशांनाच होत असल्याचे अमेरिकी वाणिज्यमंत्री विल्बर रॉस यांनी म्हटले आहे. युरोपीय देशदेखील अमेरिकी वस्तूंवर आयात शुल्क लावण्याची शक्यता त्यांनी फेटाळली आहे.  


एका मुलाखतीत बोलताना रॉस यांनी सांगितले की, “जागतिक युद्धानंतर युरोप आणि आशियाच्या पुनर्निर्मितीसाठी अमेरिकेने आयात शुल्क रद्द करण्याचे धोरण अवलंबले हाेते, ते त्या परिस्थितीनुसार योग्य होते. आता हे देश मोठे आणि मजबूत झाले आहेत. त्यामुळे तेच धोरण कायम ठेवणे चुकीचे आहे. प्रस्तावित आयात शुल्क अत्यंत कमी आहे. यातून अमेरिकेला वर्षभरात केवळ ९ अब्ज डॉलर (५८,५०० कोटी रुपये) मिळतील, जे अर्थव्यवस्थेच्या एक टक्कादेखील नाही.’  


ट्रम्प यांच्या प्रस्तावाला चीन आणि युरोपियन युनियनने विरोध केला आहे. मात्र, त्याचा ट्रम्प यांच्यावर परिणाम होताना दिसत नाही. अमेरिका इतर वस्तूंवरदेखील आयात शुल्क लावणार असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. युरोपात आधीपासूनच खूप जास्त आयात शुल्क असल्याने अमेरिकी कंपन्यांना तेथे व्यापार करण्यास अडचणी येत असल्याचे ट्रम्प म्हणाले. युरोपने करात वाढ केली तर आम्ही त्यांच्या कारवर कर लावू, असेही त्यांनी सांगितले.

 

भारतातून अमेरिकेला १३,००० कोटींची निर्यात 
अमेरिकेला भारतातून स्टील आणि अॅल्युमिनियमची जास्त निर्यात होत नाही. वर्ष २०१६-१७ दरम्यान अमेरिकेला १०,६८७ कोटी रुपयांचे लोखंड, स्टील आणि त्यापासून तयार वस्तूंची निर्यात झाली आहे. या व्यतिरिक्त अॅल्युमिनियम आणि त्यापासून तयार वस्तूंची २,३४६ कोटी रुपयांची  निर्यात झाली हाेती. अमेरिकेला होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी या दोन्ही धातूंची भागीदारी केवळ ४.६ टक्के आहे.

बातम्या आणखी आहेत...