आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या इनबॉक्समधून उत्तराचा ई-मेल फेसबुक करते डिलीट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- फेसबुकमुळे झालेल्या त्रासाची तक्रार करण्यासाठी लोक अनेकदा कंपनीच्या अधिकाऱ्यांना ई-मेल पाठवतात. कंपनीचे अधिकारी या ई-मेलला उत्तरदेखील देतात. मात्र, त्यांनी दिलेले उत्तर तुमच्या ई-मेलच्या इनबॉक्समध्ये काही दिवसांनी दिसत नाही. त्यासाठी मार्क झुकेरबर्गच्या कंपनीने गोपनीय टूल विकसित केले आहे, जे ई-मेल मिळणाऱ्याच्या मेल बॉक्समधून उत्तराचा मेल डिलीट करते. दुसऱ्या भाषेत सांगायचे झाल्यास, झुकेरबर्गकडे तुम्ही पाठवलेल्या ई-मेलची काॅपी नेहमीच राहील, मात्र त्याच्या उत्तरात आलेल्या ई-मेलचा पुरावा राहणार नाही.  

टेक्नॉलॉजी वेबसाइट ‘टेकक्रंच’ने या गोपनीय टूलचा शोध घेतला आहे. वेबसाइटच्या वतीने करण्यात आलेल्या खुलाशानंतर फेसबुकनेही असा टूल असल्याचे मान्य केले आहे. त्यासाठी त्यांनी सोनीचा हवाला दिला आहे. २०१४ मध्ये सोनी पिक्चर्सची वेबसाइट हॅक करून कंपनीच्या अधिकाऱ्यांची ई-मेल हिस्ट्री काढण्यात आली होती. त्यामुळे कंपनीतील काही गोपनीय माहिती सार्वजनिक झाली होती. त्यानंतर झालेल्या वादामुळे सोनीचे उपाध्यक्ष एपी पास्कल यांना राजीनामा द्यावा लागला होता.  


या घटनेनंतर आम्ही अधिकाऱ्यांच्या संचारसंबंधित सुरक्षिततेत अनेक बदल केले असल्याचेही फेसबुकने म्हटले आहे. या उपायांतर्गत फेसबुक मेसेंजरमध्ये झुकेरबर्ग यांचे मेसेज राहण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. हा निर्णय कायद्यानुसार घेण्यात आला असल्याचेही फेसबुकच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, याची आधी माहिती देण्यात आली नसल्याने अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.  


कंपनीने युरोपियन युनियनमधील २७ लाख लोकांचा वैयक्तिक डाटा थर्ड पार्टीला दिला असल्याचेही फेसबुकने मान्य केले आहे. केंब्रिज अॅनालिटिका डाटा लीक प्रकरण समोर आल्यानंतर ईयूने मागील आठवड्यातच कंपनीकडे यासंबंधित माहिती मागितली आहे. डाटा लीक नियंत्रणासाठी कंपनीने केलेल्या  उपायांची माहिती ईयूचे अधिकारी पुढील आठवड्यात फेसबुकचे सीओओ शेरिल सँडबर्ग यांना विचारणार आहे.  यादरम्यान इंडोनेशियानेही सोशल वेबसाइटच्या विरोधात तपास सुरू केला आहे. येथील १० लाख नागरिकांचा डाटा कंपनीने केंब्रिज अॅनालिटिकाला दिला होता. आरोपात तथ्य आढळल्यास इंडोनिशियामधील फेसबुकच्या अधिकाऱ्यांना १२ वर्ष तुरुंगवास आणि ५.६ कोटींचा दंड लावला जाऊ शकतो. जगभरातील ८.७ कोटी युजरचा डाटा लीक झाल्याचे फेसबुकने आधीच मान्य केले आहे. यात भारतातील ५.६ लाख युजरचा समावेश आहे. 

 

माहिती समोर येताच सीओओंनी युजर्सची माफी मागितली  
युजरच्या इनबॉक्समध्ये हस्तक्षेप होत असल्याचे वृत्त समोर येताच कंपनीच्या सीओओ शेरिल सँडबर्ग यांनी माफी मागितली. त्यांनी सांगितले की, ‘कंपनीमध्ये आपल्याला व्यवस्थापनात अनेक बाबीत बदल करावा लागतो. आम्ही चुका केल्या असून मी त्या सर्वांची जबाबदारी घेते. आमच्या चुकीतूनच आम्हाला सुधारायचे आहे.’ आठवडाभर आधीच संस्थापक - सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी केंब्रिज अॅनालिटिका डाटा लीकवर माफी मागताना म्हटले होते की, “ही माझी जबाबदारी आहे. मी कंपनी सुरू केली होती. ही कंपनी मी चालवतो. येथे काहीही झाले तर त्यासाठी मी जबाबदार आहे.’ 

 

मेसेंजरवर पाठवलेले मेसेज आणि फोटोही स्कॅन करतो फेसबुक  
युजरला नाव तसेच ई-मेलवरून ओळखले जाईल असे फीचर फेसबुक विकसित करत असल्याचेही सीओओ शेरिल सँडबर्ग यांनी मान्य केले आहे. कंपनीने याची “डिरेक्टरी’देखील बनवली असून कंपनीने असे करायला नको होते. वास्तविक ही सर्व माहिती आधीच सार्वजनिक होती. यादरम्यान मेसेंजरमध्ये जे मेसेज किंवा फोटो लिंक पाठवली जाते तीदेखील फेसबुक स्कॅन करत असल्याचेही कंपनीने मान्य केले असल्याचा दावा एका वृत्तपत्राने केला आहे.

बातम्या आणखी आहेत...