आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठा - वेरू‌ळचे दर्शन लवकरच हेलिकॉप्टरने, अनोख्या पर्यटनाचा लाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पहिल्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याला सोमवारपासून मुंबईत प्रारंभ झाला. अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, ग्रीस, जपान यासह अन्य देशांतील पर्यटन, हॉटेल कंपन्यांचा यात सहभाग आहे. या निमित्त महाराष्ट्र ‘टुरिझम हब ’ कसे बनेल या संदर्भात महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन यांनी "दिव्य मराठी'शी केलेली बातचीत.
प्रश्न : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळाव्याचा राज्याला कसा फायदा होईल?
उत्तर : राज्याच्या पर्यटन क्षेत्राचा विचार करता सध्या मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत आहे. पर्यटनाची उत्पादने सध्या खूप आहेत. त्यामध्ये खासगी उद्योजक तसेच हॉटेल उद्योगांच्या उत्पादनाचाही समावेश आहे; पण ही उत्पादने खरेदीदारांपर्यंत पोहोचवण्यात आम्ही कमी पडत आहोत. खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात सध्या पोकळी निर्माण झाली आहे. या आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळ्यातून ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न आहे.

प्रश्न : पर्यटनवाढीच्या दृष्टीने या मेळ्याचा फायदा कसा होऊ शकेल?
उत्तर : राज्याच्या पर्यटनामध्ये दरवर्षी साधारणपणे सहा ते सात टक्के वाढ होत आहे. या मेळाव्यामध्ये खरेदीदार आणि विक्रेते यांच्यामध्ये जर चांगले नेटवर्क तयार झाले तर महाराष्ट्राच्या पर्यटनामध्ये आठ ते दहा टक्क्यांनी वाढ होईल, असा विश्वास वाटतो.

प्रश्न : पर्यटन व्यवसायातील उलाढालीवर काय फरक पडेल?
उत्तर : या मेळाव्याचे नेमके ठोस फलित काय असेल याबाबत या क्षेत्रातील जुन्या जाणकारांबरोबर चर्चा केली असता येणाऱ्या तीन वर्षांत पर्यटन व्यवसायामध्ये सहा दशलक्ष डॉलरची संपत्ती निर्माण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. या मेळाव्यात खरेदीदार अाणि विक्रेते या दोघांचेही प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्राच्या उत्पादनांची विक्री करणारे सध्या सरासरी १४७ विक्रेते आहेत. आणि २५० पेक्षा जास्त खरेदीदार येथे आलेले आहेत. विशेष म्हणजे तीन दिवसांमध्ये खरेदीदार – विक्रेते यांच्यामध्ये नऊ हजारपेक्षा जास्त बैठका होणार अाहेत. या बैठकांमधून काही निश्चित असे करार होतील.

प्रश्न : पर्यटनाला बळकटी देण्यासाठी योजना काय?
उत्तर : पर्यटन क्षेत्रात खासगी - सार्वजनिक भागीदारी सुरू करत आहोत. सध्या आम्ही १३२ टूर ऑपरेटरबरोबर काम करत आहोत. पण आता अन्य खासगी क्षेत्रातील व्यावसायिकांच्या उत्पादनांचे मार्केटिंग करण्याची आमची तयारी आहे. अन्य राज्यांच्या सरकारी पर्यटन मंडळांच्या उत्पादनांचादेखील त्यात समावेश आहे. या मेळाव्यात १६ राज्यांमधील पर्यटन मंडळे तसेच हॉटेल्सचा सहभागी झाले आहेत. या मेळाव्याचे पहिले फलित म्हणजे जम्मू- काश्मीर टुरिझमबरोबर सहकार्य करार होत आहे. त्यामुळे आता काश्मीरमधल्या शिकाऱ्याचे बुकिंग मुंबईतून करता येणे शक्य होणार आहे. केवळ इतकेच नाही, तर बुकिंगसाठी नवीन वेबसाइट सुरू करत आहोत. एमटीडीसीच्या पर्यटन केंद्राचे ‘आऊटसोर्सिंग’ करण्याचादेखील विचार आहे.
अनोख्या पर्यटनाचा लाभ
पहिल्या टप्प्यात मुंबई दर्शन सुरू करण्यात आलेले आहे. दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद- अजिंठा- वेरूळ- औरंगाबाद आणि मुंबई ते एलिफंटा यांचा समावेश आहे. सध्या या हेलिकाॅप्टर फेरीसाठी दर काय ठेवावा, यावर चर्चा सुरू आहे. केवळ विदेशीच नाही, तर स्थानिक पर्यटकांनीदेखील या अनोख्या पर्यटनाचा लाभ घ्यावा यासाठी वाजवी दर असावेत, असे मत पराग जैन यांनी या वेळी व्यक्त केले.