Home »Business »Business Special» Apple Can Be First Trillion Dollar Company Due To The IPhone-8

आयफोन-8 मुळे अॅपल जगातील पहिली ट्रिलियन डॉलरची कंपनी होण्याची शक्यता

वृत्तसंस्था | Aug 11, 2017, 02:58 AM IST

  • आयफोन-8 मुळे अॅपल जगातील पहिली ट्रिलियन डॉलरची कंपनी होण्याची शक्यता
सन फ्रान्सिस्को-अॅपलचा नवा स्मार्टफोन आयफोन-८ पुढील महिन्यात बाजारात दाखल होणार अाहे. अलीकडच्या वर्षांत अॅपलच्या वतीने करण्यात आलेला हा सर्वात मोठा लाँच ठरणार असल्याची चर्चा आहे. आयफोन - ८ व्यतिरिक्त कंपनी सेव्हन एस आणि सेव्हन एस प्लसदेखील बाजारात आणत आहे. यांची किंमत ९०० ते १,१०० डॉलरपर्यंत राहण्याची अपेक्षा आहे. या नव्या फोनमुळे अॅपल ट्रिलियन डॉलरची (६४ लाख कोटी रुपये) जगातील पहिली कंपनी ठरण्याची अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या या अॅपलचा मार्केट कॅप ८३५ अब्ज डॉलर (५३.४ लाख कोटी रुपये) चा आहे. २०१७ आयफोनचे दहावे वर्ष आहे. अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांनी ९ जानेवारी २००७ रोजी आयफोनची घोषणा केली आणि याच वर्षी जून महिन्यात पहिला फोन बाजारात आणला होता.

आतापर्यंत कोणत्याही फोनमध्ये पहिल्यांदाच बघायला मिळतील, असेही काही फीचर्स या नव्या फोनमध्ये असल्याची चर्चा आहे. या फोनचे काही फोटोग्राफही लीक झाले असून त्यानुसार पांढऱ्या, जेट ब्लॅक आणि नवीन कॉपर गोल्ड किंवा शँपेन गोल्ड या रंगांमध्ये हा उपलब्ध असेल. यामध्ये ड्युएल लेन्स कॅमेरे असून फोनची साइज ५.८ इंच इतकी असेल.

जून तिमाहीमध्ये अॅपलचे निकाल तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा चांगले आले आहेत. एप्रिल- जून मध्ये कंपनीचा महसूल ४५.४ अब्ज डॉलर राहिला जो वर्षभरापूर्वीच्या तुलनेत ७ टक्के जास्त आहे. शेअर बाजारावर लक्ष ठेवणारी संस्था मार्केटवॉचनुसार निकालानंतर आठवडाभरातच कंपनीचा मार्केट कॅप ५६ अब्ज डॉलर (३.५ लाख कोटी रु.) वाढला आहे. आयफोन - ८ कंपनीसाठी “सुपर सायकल’ सिद्ध होईल. त्यानंतर एक ते दीड वर्षात अॅपलचा मार्केट कॅप एक ट्रिलियन डॉलरच्याही वर जाण्याची शक्यता गुंतवणूकदार कंपनी आरबीसी कॅपिटलचे तज्ज्ञ अमित दरियानानी यांनी व्यक्त केली आहे. सध्या कंपनीच्या एका शेअरची किंमत १६१ डॉलर आहे. एक ट्रिलियन डॉलर मार्केट कॅपसाठी कंपनीच्या एका शेअरची किमत १९२ - १९५ डॉलर असायला हवी.

२०% वाढीची गरज
सध्या अॅपलचा मार्केट कॅप ८३५ अब्ज डॉलर चा आहे. एका शेअरची किंमत १६१ डॉलर आहे. किंमत १९५ डॉलर झाली तर मार्केट कॅप एक ट्रिलियन डॉलर होईल. म्हणजे शेअरच्या भावात केवळ २० टक्के वाढ होण्याची गरज आहे.

Next Article

Recommended