कधी गॅरेज चालवणारा / कधी गॅरेज चालवणारा आज आशियात सर्वात श्रीमंत

वृत्तसंस्था

May 12,2015 04:30:00 AM IST
न्यूयाॅर्क/चेन्नई- चेन्नईत जन्मलेले अरुण पुदूर आशियातील सर्वात तरुण उद्योगपती ठरले आहेत. जगातील श्रीमंतांचा ताळेबंद ठेवणारी संस्था वेल्थ एक्सने चाळिशीच्या आतील उद्योजकांच्या सूचीत ३४ वर्षीय अरुण यांना सर्वोच्च स्थान दिले. त्यांची सलफ्रेम ही साॅफ्टवेअर कंपनी असून संपत्ती २५ हजार कोटी आहे. वर्ड प्रोसेसर मायक्रोसाॅफ्टनंतर दुसऱ्या स्थानी सेलफ्रेम आहे.
चीनचे झोऊ याहुई यादीत दुसरे आहेत. चीनमधील आॅनलाइन काॅस्मेटिक कंपनीचे मालक ३२ वर्षीय लीओ चेन सर्वात तरुण ठरले.
चाळिशीत अब्जाधीश होणाऱ्यांच्या यादीत अरुण यांचे नाव मार्चमध्ये झुकेरबर्ग यांच्यासोबत आले होते. तेव्हा अरुण यांनी ‘मनोरमा’ मासिकाला वाटचालीविषयी सांगितले होते.
ते सांगतात, सहावीत होतो तेव्हा कुटंुब बंगळुरूत आले. वडील कमी बजेटच्या चित्रपटांत सिनेमाटोग्राफर होते. दर शुक्रवारी नशीब ठरायचे. त्यांनी हे काम करावे असे मला वाटत नव्हते. म्हणून गॅरेज सुरू केले. घराजवळच एका दुकानावर काम करणाऱ्या तामिळी मुलाशी मैत्री झाली. गॅरेजमध्ये चांगली कमाई असल्याचे त्याने सांगितले. आईकडून ८०० रुपये घेतले आणि मी काम सुरू केले. काम येत नव्हते आणि गुगलही नव्हते. त्याचे बघून शिकलो. पुढे मग कायनेटिक होंडाचे इंजिन सव्वा तासात दुरुस्त करू लागलो. व्यवसाय चालू लागला, पण सहा महिन्यांत तो मुलगा निघून गेला. पैशाची चणचण नव्हती, पण मला माझे काम हवे होते. म्हणून गॅरेज सुरू ठेवले. नंतर शिक्षणासाठी बंद केले. मग कुत्र्यांचा व्यवसाय केला. २०-२० हजारांत पिले विकली. मार्केटिंग शिकलो. लक्षाधीश झालो. १९९८ मध्ये सेलफ्रेम काढली. १७ वर्षांचा होतो म्हणून फंडरेझिंगमध्ये अडचणी आल्या. लोकांनीही गैरफायदा घेतला, पण त्यातून दुनियादारी शिकलो. सेलफ्रेम बासनात गुंडाळली, नोकरी धरली. ज्या कंपनीत गेलो तिचा व्यवसाय ४ लाखांचा होता. मी एक कोटीवर नेऊन ठेवला. बाॅसने कमिशन देण्याचा शब्द पाळला नाही. दुसरा धडा मिळाला. नोकरी सोडली. पुन्हा सेलफ्रेम सुरू केली. २००६ मध्ये कंपनी एक अब्जाची झाली.

मी अनेक सीईओ बघितले आहेत. हयातभर ते दीडशे कोटींची कंपनी चालवतात. निवृत्तीनंतर काही लाख डाॅलर घेऊन परत जातात. मी असे होऊ इच्छित नाही. - अरुण पुदूर
X