आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीसची दिवाळखोरी, भारताची खबरदारी, भारतावर थेट परिणाम नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ग्रीसचे पंतप्रधान एलिक्सिस त्सिप्रास यांनी सोमवारी देशातील सर्व बँका बंद ठेवण्यास सांगितले आहे. तसेच एटीएममधून रक्कम काढण्यावर निर्बंध घातले आहेत. येत्या आठवडाभर बँकांचे कामकाज होणार नाही. या काळात खातेधारकांना दिवसाकाठी ६० युरोपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. तसेच परवानगीशिवाय देशाबाहेर पैसे पाठवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, युरोपीय सेंट्रल बँकेने (ईसीबी) ग्रीसमधील बँकांसाठी आर्थिक मदत न करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जाच्या खाईत गेलेल्या ग्रीसमध्ये सरकारच्या बँक बंदीमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यामुळे भारतासह जगातील प्रमुख शेअर बाजारांत घसरगुंडी दिसून आली. ग्रीसच्या आर्थिक संकटांमुळे भारतातून होणारी सॉफ्टवेअर व अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात, विदेशी संस्थांकडून भांडवल बाजारातून निधीचा उपसा होऊ शकतो. ग्रीक संकटाचा भारतावर प्रत्यक्षरीत्या फारसा परिणाम होणार नसल्याचे मत वित्त सचिव राजीव महर्षी यांनी व्यक्त केले आहे.
ग्रीसमध्ये नेमके काय झाले
दशकभरापासून ग्रीसच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे १.५ अब्ज युरोचे कर्ज ग्रीसकडे आहे. ते फेडण्याची मुदत ३० जूनपर्यंत संपते. मात्र, ग्रीस हे कर्ज फेडू शकत नाही. त्यामुळे ग्रीस दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. तसेच युरोपीय समुदायाने ग्रीसला आर्थिक मदत देण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यातूनच ही स्थिती ग्रीसमध्ये आली आहे.
मार्ग काय ?
आता सर्व नजरा पाच जुलैकडे लागल्या आहेत. ईसीबीसह सर्व ऋणकोंनी ग्रीसला आर्थिक मदत देण्यास नकार दिला आहे. आता युरोपीय समुदायात राहायचे की बाहेर पडायचे याबाबत जनमत घेण्यात येत आहे. त्याचा निर्णय पाच जुलैला जाहीर होणार आहे. आयएमएफच्या एमडी क्रिस्तिना लॅगार्ड यांनी यातून मार्ग काढण्यासाठी ग्रीसशी चर्चेची तयारी दर्शवली आहे.
ग्रीसमध्ये भीती
बँकांतून पैसे काढण्यावर बंदी येईल किंवा त्यांची युरो चलनातील रक्कम ग्रीसच्या ड्राक्मा या चलनात रूपांतरित करण्यात येईल, अशी भीती ग्रीसमधील लोकांना आहे. कारण ड्राक्माचे मूल्य सध्या तरी मातीमोल आहे.
भारतावर परिणाम
- सॉफ्टवेअर व अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीवर परिणाम
- विदेशी गुंतवणूकदार भांडवल बाजारातून गुंतवणूक मोठ्या प्रमाणात काढून घेणार
- युरोपात नेहमी निर्यात करणाऱ्या कंपन्यांना फटका बसण्याची शक्यता
- डॉलर, ब्रिटिश पाउंड महागणार, रुपया घसरण्याची शक्यता
आवाहन
दरम्यान, ग्रीसमधील जनमत चाचणीच्या निकालापर्यंत युरोपातील देशांनी थांबावे, असे कळकळीचे आवाहन ग्रीसचे पंतप्रधान एलिक्सिस त्सिप्रास यांनी केले आहे. दूरचित्रवाणीवरील भाषणात त्यांनी शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच लोकांचे पैसे, वेतन आणि पेन्शन सुरक्षित असल्याचा विश्वास दिला.

भारतावर थेट परिणाम नाही, तज्ज्ञांचे मत
राजीव महर्षी, वित्त सचिव
ग्रीक संकटाचा भारतावर थेट परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. भांडवली बाजारात निधीचा उपसा होऊ शकतो. रिझर्व्ह बँकेला परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
राजीव खेर, वाणिज्य सचिव
ग्रीसशी भारतीय निर्यातीचा थेट संबंध नाही. मात्र ग्रीक संकट चिघळल्यास देशाच्या युरोपात होणाऱ्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो.
असोचेम, उद्याेग संघटना
भारतीय अर्थव्यवस्था ग्रीसवर फारशी अवलंबून नाही. मात्र या संकटाचा युरोपीय समुदायावर परिणाम झाल्यास त्याचा भारतावर परिणाम होईल.
बातम्या आणखी आहेत...