आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP's Stubborn Attitude Blocked GST Bill: P Chidambaram

मोदी सरकारच्या अडवणुकीमुळेच जीएसटी अडकले : चिदंबरम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसने आर्थिक मुद्द्यावर मोदी सरकारवर अनेक आरोप केले. सरकारच्या अडवणुकीमुळेच वस्तू आणि सेवाकराबाबत चर्चा पुढे जात नसल्याचे माजी अर्थमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सांगितले. देशाच्या अर्थव्यवस्थेत जडता आली असल्याचा दावादेखील त्यांनी केला. सरकारच्या वतीने रोजगार, जास्त गुंतवणूक आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तेजीने विकासाची अनेक आश्वासने देण्यात अाली होती. मात्र, प्रत्यक्षात काहीच दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी जीएसटीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना बोलावले होते. त्या वेळी काँग्रेसच्या वतीने तीन शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. या विषयावर आपण पुन्हा चर्चा करू असे त्या वेळी मोदींनी सांगितले असले तरी अद्याप सरकारच्या वतीने कोणतेच उत्तर आले नसल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. त्यामुळे चेंडू पूर्णपणे सरकारच्या कोर्टात असल्याचेही ते म्हणाले. काँग्रेसच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या तीन मुद्द्यांपैकी दोन मुद्द्यांवर तर सरकारचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यमदेखील सहमत असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या वतीने जीएसटी संविधान बिलात जीएसटी दराचा उल्लेख करण्यात यावा, राज्यात असलेला अतिरिक्त कर रद्द करण्यात यावा आणि तंटे सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती बनवण्यात यावी अशा तीन मागण्या सरकारसमोर ठेवण्यात आल्या असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. बिहारमध्ये निवडणुका झाल्यानंतर सरकार विरोधी पक्षासोबत चर्चा करेल, अशी आमची अपेक्षा होती. मात्र, असे झाले नसून त्यामुळेच अनेक आवश्यक बिले संसदेत अडकली असल्याचे त्यांनी सांगितले. जीएसटी आणि इतर िवरोधी पक्षांनी विधेयकांबाबत घेतलेले आक्षेप तर्कशुद्ध असल्याचे ते म्हणाले.

ग्रामीण भागात निराशा
देशातील कृषी तसेच अनेक क्षेत्रांत सलग घसरण सुरू आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक सरकारच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे ते म्हणाले. एमएसपीला सरकारनेच कमी ठेवले असल्याचा आरोप त्यांनी केला. या वर्षी कृषी क्षेत्रातील उत्पादन कमी होण्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरी भागात भीती
शहरात राहणाऱ्या नागरिकांची स्थितीदेखील खूप चांगली नसल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. खाण्यापिण्याच्या वस्तू, वीज आणि पाण्याच्या वाढत्या किमती, नोकरीच्या कमी संधी आणि देशात वाढत असलेल्या असहिष्णू वातावरणामुळे शहरातील महिला, मुले व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचा आरोप त्यांनी केला.