आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक टप्प्यावर अाकाशाला गवसणी घालण्याची इच्छा ठेव, चंदा कोचर यांचे मुलीला पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयसीआयसीआय बँकेच्या एमडी आणि सीईओ चंदा कोचर यांनी आपली मुलगी आरतीला भावपूर्ण पत्र लिहिले आहे. आयुष्याच्या कटुसत्याबरोबरच त्यांनी तिला आव्हानांना सामोरे जात पुढे जाण्याची शिकवण दिली आहे. हे पत्र कोट्यवधी नोकरपेशा महिलांसाठी प्रेरणास्रोत आहे.
डिअर आरती,
तुला विश्वासाने भरलेल्या एक महिलेच्या रूपात पाहताना मला तुझा अभिमाना वाटत आहे. यामुळे मला माझ्या बालपणीची आठवण येते. माझ्या आई-वडिलांनी भावासोबतच आम्हा दोघी बहिणींना वाढवले. त्यात कधी मुलगा-मुलगी असा भेदभाव केला नाही. ज्या कामात आनंद मिळतो ते काम पूर्ण समर्पण भावाने करण्याचे ते नेहचीच सांगत. यामुळे आपल्यात निर्णय घेण्याची क्षमता वाढते. मी फक्त १३ वर्षांची असताना हृदयरोगाने वडिलांचे छत्र हरपले. एकाच दिवसात माझे जगच बदलले. तिन्ही मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आईवर आली. ती किती मजबूत आहे, हे त्या वेळी आम्हाला समजले. तिने कपड्यावर डिझायनिंग करण्याचे कौशल्य आत्मसात करत छोट्याशा कंपनीत नोकरी केली. एकटीने कुटुंब सांभाळणे अवघड गेले असेल, पण तिने त्याची जाणीव आम्हाला होऊ दिली नाही. आम्ही आमच्या पायावर उभे राहीपर्यंत ती मेहनत करतच होती.

कामाचा परिणाम कुटुंबावर पडू न देता काम करणे कोणत्याही काम करणाऱ्या आईसाठी महत्त्वाचे असते. मला एमडी आणि सीईओ बनवण्याची घोषणा झाली तेव्हा तू अमेरिकेत शिक्षण घेत होतीस, हे तुला आठवतच असेल. तू मला ई-मेल केला होतास. त्यात लिहिले हाेते की, "तुझे काम इतके चांगले आणि तणावाचे अाहे हे तू कधी मला जाणवू दिले नाहीस. घरी तर तू फक्त माझी आई होतीस' डार्लिंग, तूदेखील तुझे आयुष्य असेच जग.
कठीण परिस्थितीचा सामना करत पुढे जाणे किती महत्त्वपूर्ण आहे, हे मी माझ्या आईकडून शिकले. अडचणींचा सामना करत आणखी मजबूत हो, अडचणींना स्वत:वर वरचढ होऊ देऊ नकोस. मला आठवते की, २००८ च्या जागतिक मंदीनंतर आयसीआयसीआय बँकेच्या अस्तित्वावर संकट आले होते. त्या वेळी मी बँकेत पैसे जमा करणारे, गुंतवणूकदार, सरकार आणि नियामक सर्वांशी चर्चा केली होती. त्यांना सांगितले की खूप कमी पैसा अडकलेला आहे. खातेदार पैसे काढण्यासाठी बँकेत आल्यास त्यांच्याशी प्रेमाने बोलण्याचे कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यांना बसवून पाणी पाजा, त्यांना समजावून सांगा की बँकेवर संकट नाही, तुम्ही तुमचे पैसे कधीही काढू शकता.

त्याच काळात तुझ्या भावाची स्क्वॅशची स्पर्धा होती. मी सुमारे दोन तास तिथेच होते. नंतर मला कळले की मी तेथे गेल्याने लोकांचा बँकेवरचा विश्वास वाढला. स्पर्धेसाठी आलेल्या अनेक महिलांनी मला विचारले की, मी आयसीआयसीआय बँकेची चंदा कोचर आहे का ? मी सांगितले, हो, मी चंदा कोचर आहे. त्या वेळी त्यांनी अंदाज लावला की, बँक संकटात असताना मी स्पर्धा पाहण्यासाठी आले, म्हणजे बँक सुरक्षित हातात आहे.
मी बँकेसोबतच आई आणि सासू-सासऱ्यांनाही वेळ देत होते. त्या बदल्यात त्यांनीदेखील प्रेम आणि प्रोत्साहन दिले. नाती महत्त्वपूर्ण असतात हे लक्षात ठेव. त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. तुला तुझ्याशी जशा व्यवहाराची अपेक्षा आहे, तूही त्यांच्याशी तसेच वाग. मी घराच्या बाहेर राहत होते, त्यावर तुझ्या वडिलांनी कधी आक्षेप घेतला नाही. नसता मी वरिष्ठ पातळीवर गेले नसते. आम्ही दोघेही आपापल्या कामात व्यग्र होतो, तरीदेखील आम्ही आमच्या नात्याकडे पूर्ण लक्ष दिले. आवश्यकता पडल्यास तूदेखील तुझ्या जोडीदारासोबत असेच वागशील याचा मला विश्वास आहे.

मला आठवते, तुझ्या बाेर्डाच्या परीक्षेच्या वेळी तुला परीक्षा केंद्रात सोडण्यासाठी मी सुटी घेतली होती. पण तू मला सांगितलेस की, इतक्या वर्षांनंतर आता परीक्षेला एकटे जाण्याची तुला सवय झाली आहे. हे ऐकल्यावर मला वाईट वाटले होते. मात्र, त्यामुळे तू आत्मनिर्भर झाली याचा आनंदही झाला होता. तू तुझ्या छोट्या भावाचीही काळजी घेतलीस, त्याला माझी कमतरता भासू दिली नाहीस. हे पाहून मी ऑफिसमध्येही युवकांना जास्त जबाबदारीची कामे दिली.
मी नशिबावर विश्वास ठेवत असले तरी कठीण परिश्रमही आवश्यक आहेतच. प्रत्येक जण स्वत:चे नशीब स्वत: लिहितो. तू अाकाशाला गवसणी घालण्याची इच्छा ठेव, मात्र एक-एक पायरी चढत जा. लहान लहान पावलांनीच हा प्रवास पूर्ण होत असतो. यात अनेकदा दुसऱ्यांना न आवडणारे निर्णय घ्यावे लागतात. अशा वेळी तुझ्यात त्या निर्णयाच्या बाजूने उभे राहण्याचे धाडस असले पाहिजे.

दृढनिश्चयी व्यक्ती काय करू शकते, याला मर्यादा नाही. मात्र, स्वप्न पूर्ण करण्यासाठी तडजोड करू नकोस. लोकांविषयी संवेदनशील बन. स्वत:पेक्षा तणावाला वरचढ होऊ दिले नाहीस तर तणाव तुझ्यासाठी समस्या बनणार नाही. आयुष्यात चांगले आणि वाईट दिवस येतील, प्रत्येक संधी आणि आव्हानातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न कर.
- तुझीच ममा