आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युआनला"कळा', जगभर "वेदना'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली,/औरंगाबाद- घसरणीच्या घाटात अडकलेल्या चीनने आपले चलन युआनचे अवमूल्यन घडवून आणले. त्याचे पडसाद जगभरात उमटले. आशियातील बहुतेक शेअर बाजार आपटले. भारतातही सेन्सेक्स आपटला. रुपयाचे अवमूल्यन झाले, तर सराफा बाजारात तेजी आली. चीनने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी युआनचे अवमूल्यन केले.
मागील दोन दिवसांत युआन ४ टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे भारतातील स्टील, अभियांत्रिकी उत्पादने तसेच वस्त्रोद्योग कंपन्यांत घबराट उडाली. युआनच्या घसरणीचा परिणाम आशियातील बहुतांश केंद्रीय बँकांवरही झाला. या बँकांनी निर्यात सुलभ होण्यासाठी आपापल्या चलनाचे अवमूल्यन घडवले. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाही ६० पैशांनी घसरून ६४.७८ या दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला. आशियातील बहुतेक शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. युरोपातही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते.

भांडवल बाजारात अशी घसरणीची दाणादाण उडालेली असताना बुधवारी सराफा बाजार मात्र तेजीने चकाकला. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने तोळ्यामागे ६०० रुपयांनी वाढून २६ हजारांवर पोहोचले. सोन्याची ही यंदाची आतापर्यंतची एका दिवसातील सर्वात मोठी तेजी आहे.

आशिया-युरोपसह भारतीय भांडवल बाजारात गडगडाट
कच्चे तेल
६ वर्षांचा नीचांक
४.१८%
युआन मोठ्या प्रमाणात घसरल्याने कच्चे तेल घसरले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सहा वर्षांच्या नीचांकावर आल्या आहेत. बुधवारी डब्ल्यूटीआय क्रूड तेलाची किमत पिंपामागे ४३, तर ब्रेंट क्रूड तेल पिंपामागे ४९ डॉलरच्या खाली घसरले. नायमॅक्स बाजारात डब्ल्यूटीआय क्रूड तेल मंगळवारी ४.१८ टक्क्यांनी घसरून ४३.०८ डॉलर प्रति पिंप झाले.

कारणे : चीनमधील क्रूडची मागणी घटण्याची शक्यता, ओपेकचे सदस्य नसणाऱ्या देशांत क्रूड तेलाचे उत्पादन वाढण्याची शक्यता.

सोने : चीनने वाढवली चमक
०.६%

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने बुधवारी सलग पाचव्या दिवशी तेजीत राहिले. कॉमेक्स बाजारात सोने तीन आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. सिंगापूर सराफ्यात सोने औंसामागे (२८.३४ ग्रॅम) ०.६ टक्क्यांनी वाढून १११५.४८ डॉलरवर पोहोचले. दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे ६०० रुपयांनी वाढून २६००० झाले, तर चांदी किलोमागे ६४० रुपयांनी वाढून ३५,७०० वर पोहोचली.
कारणे : जगभरातील
चलनांच्या अवमूल्यनाने सुरक्षित उपाय म्हणून गुंतवणूकदारांकडून सोन्याला पसंती. शेअर बाजारातील घसरणीने सोन्याची मागणी वाढली.
धातू : ड्रॅगनच्या धास्तीने घसरगुंडी
०.९०% तांबे
लंडन मेटल एक्स्चेंज बाजारात निकेल, तांबे आणि अॅल्युमिनियमच्या या बेस मेटल्सच्या किमती सहा वर्षांच्या नीचांकी पातळीपर्यंत घसरल्या. निकेल ३.५ टक्क्यांनी घसरून टनामागे १०,३८० डॉलर, तांबे ०.९० टक्के घसरणीसह टनामागे ५०७९ डॉलर, तर अॅल्युमिनियम ६ वर्षांच्या घसरणीसह टनामागे १५५८ डॉलरवर आले.

कारणे : युआनचे अवमूल्यन झाल्याने चीनमधून धातूंची मागणी घटण्याची भीती. चीन धातूंचा सर्वात मोठा आयातदार असल्याने धातूंची आयात महागण्याची शक्यता.

सेन्सेक्स : चीनसह विधेयकांची धास्ती
१.२%
युआनच्या अवमूल्यनाबरोबरच संसदेतील जीएसटी, भूसंपादन आदी विधेयके लटकण्याच्या काळजीने शेअर बाजारात बुधवारी घसरण झाली. सेन्सेक्स ३५३.८३ अंकांच्या घसरणीसह २७५१२.२६ वर बंद झाला. निफ्टी ११२.९० अंकांच्या घटीसह ८३४९.४५ वर स्थिरावला. रिअॅल्टी, धातू, रिफायनरी, बँकींग, ऑटो, पॉवर, भांडवली वस्तू आणि एफएमसीजी समभागांना फटका.

कारणे : युआनचे दोन दिवसांत ४ टक्के अवमूल्यन. विदेशी संस्थांकडून विक्री. चीनमधील मंदी. जीएसटी, भूसंपादन विधेयके संसदेत लटकली.