आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • CM Devendra Fadnavis Takes 'Make In Maharashtra' Mission To Japan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र ‘फॅक्टरी ऑफ ग्लोब’, तंत्रकुशल तरुणाई असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - समृद्ध लोकशाही आणि त्यासोबतच भविष्यात मोठ्या संख्येने उपलब्ध होणारी तंत्रकुशल तरुणाई यामुळे भारतासोबतच महाराष्ट्रही ‘फॅक्टरी ऑफ ग्लोब’ होण्याच्या दिशेने आगेकूच करीत आहे, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ओसाका (जपान) येथे व्यक्त केला.

जपान दौर्‍याच्या पहिल्या दिवशी ओसाका येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि जपानमधील जेट्रो उद्योगसमूह यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य गुंतवणूक प्रोत्साहन चर्चासत्रात (महाराष्ट्र स्टेट इन्व्हेस्टमेंट प्रमोशन सेमिनार) मुख्यमंत्री अध्यक्षीय समारोपात बोलत होते. या चर्चासत्रात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, जेट्रोचे महासंचालक हिरोकी मत्सुमोटो, जेट्रो मुंबईचे महासंचालक टाकेहिको फुरुकावा सहभागी झाले होते. या वेळी एमआयडीसी आणि जेट्रोकडून गुंतवणुकीबाबत सादरीकरण करण्यात आले.

मुख्यमंत्री म्हणाले की, स्वयंप्रमाणीकरणाच्या माध्यमातून राज्यात उद्योगसुलभता आणण्यात आली आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची ही सर्वाधिक योग्य वेळ आहे. औद्योगिक क्षेत्रातील जपानच्या यशोगाथेने आम्ही प्रभावित झालो असून त्यापासून प्रेरणा घेऊन आमच्या देशातही औद्योगिक परिवर्तनास सुरुवात केली आहे. ओसाका येथील कन्साई आर्थिक परिषद आणि ओसाका चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.

परिषदेचे उद्घाटन
भारत पुरवठादार साखळी परिषदेचे (इंडिया सप्लाय चेन कॉन्फरन्स) मुख्यमंत्र्यांनी उद््घाटन केले. तसेच ओसाका पोर्ट प्रमोशन असोसिएशनतर्फे आयोजित चर्चासत्रातही उद्योजकांना मार्गदर्शन केले. नवीन बंदरांच्या विकासासाठी करण्यात येणार्‍या प्रयत्नांची मुख्यमंत्र्यांनी चर्चासत्रात माहिती दिली.

अजिंठा-वेरूळ विकास
तत्पूर्वी ‘व्हिजिट महाराष्ट्र बुद्धिस्ट टुरिस्ट सर्किट’ परिसंवादामध्येही मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. या वेळी त्यांनी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीच्या मदतीने (जायका) अजिंठा आणि वेरूळ येथे विकसित करण्यात आलेल्या टुरिस्ट सेंटरची माहिती दिली. येथे पहिल्या टप्प्यातील सुविधांची कामे पूर्ण केल्यानंतर जायकाच्या माध्यमातून समतोल पायाभूत सुविधा आणि अन्य विकासाबाबत सहकार्य वाढवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील लेणी, समुद्रकिनारा, गड-किल्ले, वन-वन्यजीवाबाबत उपस्थितांना माहिती दिली. तसेच जपानी पर्यटकांनी राज्याला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.