आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Disscussed With Google About Services Related To State

अमेरिका दौरा : राज्यासाठी उपयुक्त सेवांबाबत मुख्यमंत्र्यांची ‘गुगल’शी चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशभरात डिजिटल इंडिया सप्ताहास प्रारंभ झाला असतानाच महाराष्ट्र अधिक स्मार्ट करण्याच्या दृष्टिकोनातून शुक्रवारी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल टाकले. या प्रयत्नांचा पहिला टप्पा म्हणून नागपूर शहर अधिक सुरक्षित आणि स्मार्ट करण्यासाठी राज्य सरकारने सिस्को या नेटवर्किंग क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीशी सॅनफ्रान्सिस्को येथे सामंजस्य करार केला. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या विविध सेवांबाबत गुगल कंपनीशीही सकारात्मक चर्चा केली.

सिस्को ही नेटवर्किंग संदर्भातील साधनांची निर्मिती, संशोधन आणि विक्री करणारी अमेरिकेतील आघाडीची बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी सीसीटीव्ही, इंटरनेट, दळणवळणाच्या प्रगत साधनांसह अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षिततेविषयक उपाययोजना करते. नागपूर शहर अधिक सुरक्षित आणि स्मार्ट बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि सिस्को यांच्यात एका महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी करण्यात आली. नागपूर महापालिकेशी समन्वय व सहकार्याने सिस्को विविध उपाययोजना करणार आहे. त्यात अतिप्रगत दळणवळण यंत्रणा, एकात्मिक नियंत्रण, पर्यावरणविषयक तपासणी, सुधारित आरोग्य सुविधा आदींचा समावेश आहे. सिस्कोचे कार्यकारी उपाध्यक्ष पंकज पटेल, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची उपस्थिती होती.

सॅनफ्रान्सिस्को येथे झालेल्या महाराष्ट्र गुंतवणूक परिषदेत मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी संवाद साधला. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात राज्यात उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ, ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’चा परिणाम म्हणून तरुणांची मोठी संख्या आणि मानवी संसाधनांमुळे औद्योगिक क्षेत्रात अग्रदूत म्हणून भूमिका बजावण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे. महाराष्ट्र तंत्रज्ञान क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मोबाइलधारकांची मोठी संख्या, स्मार्टफोनचा वाढता वापर यामुळे अनेक उपाययोजना करणे सुलभ होत आहे. तसेच राज्याच्या माहिती तंत्रज्ञानविषयक नव्या धोरणामुळे या क्षेत्राला ऊर्जितावस्था प्राप्त होणार असून नवी कार्यसंस्कृती असलेले एकात्मिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्र तयार होण्यास मदत होईल. सिलिकॉन व्हॅलीतील राज्यात अनुकूल माध्यम निर्माण करण्याचा आमचा मानस असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गुगल मुख्यालयास भेट
मुख्यमंत्र्यांनी गुगल या प्रसिद्ध कंपनीच्या मुख्यालयास भेट देऊन कंपनीच्या ज्येष्ठ प्रतिनिधींसोबत चर्चा केली. स्ट्रीट व्ह्यू, अॅक्सेस आणि शिक्षण या क्षेत्रात रचनात्मक भागीदारी करण्यासंदर्भात ही चर्चा झाली. राज्यासाठी उपयुक्त व पथदर्शी ठरू शकणाऱ्या तंत्रज्ञानाची निश्चिती करण्यासाठी गुगलचे एक पथक राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर त्यांनी सिमॅन्टेकच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

महत्त्वपूर्ण बैठका
मुख्यमंत्री आणि इनक्युबेटर प्रमोटर्ससोबत झालेल्या बैठकीत त्यांनी स्टॉर्म व्हेंचर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक संजय सुभेदार, गुंतवणूकदार प्रकाश भालेराव आणि बुलपेन कॅपिटलचे डंकन डेव्हिडसन यांच्याशी चर्चा केली. गेल्या वर्षभरातच देशात तंत्रज्ञानविषयक ८०० नवीन उद्योजकांनी कार्यास सुरुवात केली असून शिक्षण, रोजगार यादृष्टीने हा ‘स्टार्टअप’ महत्त्वाचा ठरू शकेल.