सध्याच्या तीव्र स्पर्धेच्या काळात
आपले वेगळेपण हीच आपली संस्कृती ठरते व तीच आपली मोठी शक्ती बनते, असे मला वाटते म्हणूनच उद्योग जगतात कंपनीची किंवा व्यवस्थापनाची चर्चा होते, तेव्हा पटकन टाटा कल्चर, व्हिडीओकॉन कल्चर, असा उल्लेख केला जातो त्यावेळी बोलणा-या ला काही एक निश्चित मूल्यव्यवस्था सांगायची असते.शब्दकोशात संस्कृतीचा अर्थ लोकसमूहाची जीवनशैली असा आहे. त्यात लोकांचे वर्तन विश्वास आणी सामाजिक मूल्ये यांचा समावेश असतो. या व्याख्येतील वर्तन आणी विश्वास आपण कोणती मूल्ये रुजवतो, जोपासतो यावरच अवलंबून असतो. भारतीय म्हणून आपल्या सर्वच उद्योगांवर या संस्कृतीचा बरावाईट प्रभाव असतोच.
पण आपल्या उदयोगासाठी आपण कोणती संस्कृती जपणार याचा स्वतंत्रपणे विचार करावा लागतो. कारण तीच आपली खरी ओळख असते. आम्ही व्हिडीओकॉन या उद्योगाची सुरुवात केली, त्यावेळी आमच्यासमोरही या उद्योगाची संस्कृती कोणती हा प्रश्न होता. उद्योगाची मूल्यव्यवस्था ठरवत असताना त्याचे तीन प्रमुख भाग पडतात. पहिला-लोक, दुसरा-उत्पादन, तिसरा-नफा आपण जी संस्कृतीची संकल्पना निश्चित करतो, त्यादृष्टीने आपल्या सहकार्यांची, अधिकारी आणी कर्मचार्यांची निवड करावी लागते. या संस्कृतीला साजेसे असेच उत्पादन बनवावे लागते. नफा आपण कोणत्या मार्गाने आणी किती मिळवणार, याचा हिशेबही मांडावा लागतो. आमचे घराणे वारकरी संप्रदायाचे संस्काराचे साहजिकच व्हिडीओकॉनची उद्योगसंस्कृती ही वारकरी संप्रदायाच्या मूल्यांवर आधारित असणार हे स्पष्टच आहे. एकदा ही मूल्यव्यवस्था ठरल्यानंतर आम्ही सहकारी निवडले टी.व्ही. संच बनवायचे हे ठरले. मग आमच्यासमोर दोन पर्याय होते. श्रीमंत उच्चभ्रू अशा थोड्या लोकांसाठी अतिशय उच्च दर्जाचे पण महागडे संच बनवणे हा पहिला पर्याय होता. दुसरा अर्थातच सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना परवडतील, असे संच बनविण्याचा होता. या दोन्ही पर्यायातच आम्हाला मिळणारा नफाही लपलेला होता. पहिल्या पर्यायात कमी संच बनवून मोठा नफा मिळाला असता तर दुस-या त तुलनेने प्रत्येक संचामागे मिळणारा नफा कमी होणार होता. मात्र सामान्यांसाठी काम करावयाचे ठरविलेले असल्यानेच आम्ही कमी नफ्याचा दुसरा पर्याय निवडला आणि त्यामुळे आम्ही अल्पावधीतच राष्ट्रव्यापी झालो.
आपण एखादीच कंपनी चालवत असतो, त्यावेळी संस्कृती, मूल्ये रुजवणे आणि जोपासणे सोपे असते. उद्योग विस्तारत जातो, समूहामध्ये नव्या कंपन्या सामील होतात, त्यावेळी ही सर्व मूल्ये नव्या कंपनीतही रुजवली जाणे आवश्यक असते. नवी कंपनी तयार होते. त्यावेळी सहकारी आणी कर्मचा-या ंची निवड करताना संस्कृती आणी मूल्यांचे भान ठेवतो. पण या नव्या समूहापर्यंत आपली मूल्यव्यवस्था स्पष्टपणे पोहाेचण्यासाठी एखाद्या ओरिएंटेशन कोर्सची गरज भासते. युरोप -अमेरिकेतल्या बहुराष्ट्रीय कंपन्यात आपल्या कंपनीची ध्येय धोरणे आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी असे नवे वर्ग नव्या उमेदवारांसाठी नियमितपणे घेतले जातात. आपल्याकडेही उद्योगसमूह उभे राहिल्यानंतर या प्रकारचे प्रशिक्षण वर्ग सुरू झाले आहेत. भारतातल्या अनेक उद्योगसमूहांनी जगातल्या पाचही खंडांत अनेक उद्योग अलीकडे विकत घेतले आहेत. व्हिडीओकॉन समूहही पाचही खंडांत पसरला आहे. वेगळा इतिहास, भूगोल, संस्कृती आणि भाषा असणा-या या समूहांना आपल्या उद्योगाची संस्कृती प्रशिक्षणातून वारंवार समजावून द्यावी लागते. हे काम सोपे नसते. आमच्या समूहात शेकडो भाषा बोली बोलणारे हजारो कर्मचारी जगभर काम करतात, पण ते सर्वदूर केवळ व्हिडीओकॉन चे कर्मचारी म्हणूनच नव्हे तर आमच्या विशिष्ट संस्कृतीचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. आपली संस्कृती आणी मूल्यव्यवस्थाच आपल्या उद्योगाला इतर उद्योगांपासून वेगळे असे व्यक्तिमत्त्व मिळवून देत असतात म्हणूनच आपली संस्कृती आणी मूल्यव्यवस्था उद्योगाच्या अगदी सुरुवातीपासूनच निश्चित करणे आवश्यक असते. कारण त्याचा आपल्या यशात फार महत्त्वाचा वाटा असतो.