आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीनंतर 4 महिन्यांत वाहन विक्रीचा टॉप गिअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नवी दिल्ली  - नोटाबंदीनंतर पहिल्यांदाच फेब्रुवारीमध्ये वाहन उद्योगात तेजी नोंदवण्यात आली आहे. सलग तीन महिन्यांच्या घसरणीनंतर फेब्रुवारी महिन्यात देशात सर्व श्रेणींमधील वाहन विक्रीमध्ये ०.९४ टक्क्यांची वाढ झाली आहे. हा आकडा वाढून १७ लाख १९ हजार ६९९ वर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात भारतीय बाजारात १७ लाख ३ हजार ७३६ गाड्यांची विक्री झाली होती. गेल्या वर्षी आठ नोव्हेंबर रोजी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. त्या नंतर नोव्हेंबरमध्ये गाडींची भारतीय बाजारातील विक्री नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्के, डिसेंबरमध्ये १८.६६ टक्के आणि जानेवारीमध्ये ४.७१ टक्क्यांची घसरण झाली होती.  
 
वाहन निर्मात्या कंपन्यांची संघटना असलेले सियामचे संचालक जनरल विष्णू माथूर यांनी या विक्रीची आकडेवारी शुक्रवारी जाहीर केली. प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या विक्रीमध्ये फेब्रुवारीमध्ये स्थिती सुधारली असल्याचे त्यांनी सांगितले. नोटाबंदीचा वाहन विक्रीवर झालेल्या विपरित परिणामांची तीव्रता दिवसेंदिवस कमी होत आहे. येत्या एक ते दोन महिन्यांत हा परिणाम पूर्णपणे संपण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दुचाकी वाहन विक्रीतील घट अत्यंत किरकोळ (०.०१ टक्के) राहिली आहे. असे असले तरी तीनचाकी वाहनांच्या विक्रीवरील परिणाम अद्याप कायम आहे. फेब्रुवारीमध्ये ११.८४ टक्क्यांच्या वाढीसह २,८५,२६५ गाड्यांची निर्यात झाली. ही वाढ २० महिन्यांत सर्वाधिक असून कार निर्यातीतही ७.४३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
ग्रामीण भागात नोटाबंदीचा परिणाम : फेब्रुवारी महिन्यात दुचाकी वाहन विक्री १३ लाख ६२ हजार ०४५ झाली. फेब्रुवारी २०१६ मध्ये हा आकडा १३,६२,१७७ होता, त्या तुलनेत या वर्षी केवळ ०.०१ टक्क्याची घट झाली आहे. मोटारसायकल विक्रीत सलग चौथ्या महिन्यात घट झाली आहे. डिसेंबर महिन्यात यामध्ये २२.५० टक्क्यांची घसरण झाली होती. जानेवारी महिन्यात कमी होऊन ही घट ६.०७ टक्के तर फेब्रुवारी महिन्यात ३.१३ टक्के राहिली. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवरील नोटाबंदीचा परिणाम अद्याप दिसत असल्याचे माथूर यांनी सांगितले.
 
व्यावसायिक वाहन विक्री ६.७८% वाढली  
बस सोडल्यास इतर व्यावसायिक वाहनांच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. बस विक्रीत ५ % घसरण नोंदवण्यात आली आहे. तर माल वाहतूक करणाऱ्या मोठ्या आणि मध्यम व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत ६.७८ % वाढ झाली आहे. हलक्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतही ९.३८ % वाढ नोंदवण्यात आली आहे. दोन्ही श्रेणीतील व्यावसायिक वाहनांची भारतीय बाजारातील एकूण विक्री ७.३४ % वाढून ६६,९३९ गाड्यांवर पोहोचली आहे. तीनचाकी वाहनांच्या विक्रीमध्ये दबाव नोंदवण्यात आला असून विक्रीचा आकडा २१.३५ टक्क्यांनी कमी होऊन ३५,३५६ गाड्यांवर पोहोचला आहे.
 
कार विक्रीत वाढ 
फेब्रुवारी महिन्यात भारतीय बाजारात एकूण दोन लाख ५५ हजार ३५९ कार विक्री झाल्या. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात विक्री झालेल्या दोन लाख ३४ हजार २४४ वाहनांच्या तुलनेत हा आकडा ९.०१ टक्के जास्त आहे. जानेवारी महिन्यात यात १४.४० टक्क्यांची वाढ झाली होती. यामध्ये एसयूव्ही आणि व्हॅन विक्रीचाही समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...